नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचे सुरक्षा कवच प्रत्येकाला मिळण्याची दक्षता घेण्यात आली असून, त्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी जिल्ह्यातील शासकीय विभाग एकजुटीने काम करीत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात लसीकरण टास्क फोर्स बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, जागतिक आरोग्य संघटनेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश नांदापूरकर आदी उपस्थित होते.
मांढरे म्हणाले, पालकमंत्री, कृषिमंत्री, जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे आणि सर्व शासकीय विभागांच्या समन्वयातून कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश मिळाले आहे. आता कोराेनाचे युद्ध अंतिम टप्प्यात असून, लसीकरणाचे कवच प्रत्येक नागरिकाला मिळवून देण्यासाठी शैक्षणिक संस्था, वैद्यकीय संघटना, आरोग्य यंत्रणा, वाहतूक विभाग यासोबतच लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी कलाकार, नाट्यप्रेमी यांची मदत घेतली जाणार आहे.
जिल्हास्तरावर कोणकोणत्या बाबींची तयारी करावी लागेल, याबद्दल बैठकीमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. नांदापूरकर यांनी लसीकरणाच्या दृष्टीने सखोल सादरीकरण केले. त्या अनुषंगाने बैठकीत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा आढावा घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी जिल्ह्याची तयारी पूर्ण झाली असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २५ हजारांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचा लसीकरणाच्या कार्यक्रमात सहभाग करण्यात आला आहे. तथापि केवळ या टप्प्यावर न थांबता संपूर्ण जिल्ह्याचे लसीकरणाच्या दृष्टीनेदेखील आताच तयारी सुरू करणे आवश्यक असल्याने दर आठवड्याला विभागनिहाय आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड लस आल्यानंतर आरोग्य कर्मचारी आणि अंगणवाडी कर्मचारी यांचे लसीकरण होणार असल्याचे सांगितले. लसीकरण झाल्यानंतर सुद्धा नागरिकांनी मास्क, सुरक्षित अंतर आणि हात स्वच्छ ठेवणे ही त्रिसूत्री पाळायची असल्याचे सांगितले.
यावेळी पोलीस अधीक्षक सचिन पाटील येणाऱ्या काळात होत असलेली लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा एकवटलेली असल्याचे सांगितले.