येवला : स्वातंत्र्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. परंतु स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. या स्वातंत्र्यातून सुराज्य निर्माण करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक डॉ. अभिमन बिरारी यांनी केले.
येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात क्रांतिदिनाचे औचित्य साधून आझादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत ‘भारताचे स्वातंत्र्य आंदोलन’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बिरारी हे बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते अर्जुन कोकाटे यांनी केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे हे होते.
यावेळी डॉ. बिरारी यांनी, समग्र भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा आढावा घेतला. नाशिक जिल्ह्यातील आंदोलनावरही प्रकाश टाकताना नाशिक, सिन्नर, येवला या शहरांतील आंदोलने लक्षणीय होती, असेही ते म्हणाले. स्वातंत्र्य आंदोलनातील अनेक ऐतिहासिक दाखले त्यांनी दिले. उद्घाटनपर मनोगतात कोकाटे यांनी, ‘स्वातंत्र्य मिळाले पण शहाणपण आले का’ असा प्रश्न उपस्थित करून जात, धर्म, पंथ, भाषाभेद, प्रांतवाद यापलीकडे जाऊन ‘प्रथम राष्ट्र’ व ‘आपण सर्व भारतीय आहोत’ ही भावना सर्वांमध्ये रुजली पाहिजे, असे सांगितले. प्राचार्य डॉ. गमे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संयोजक व विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख डॉ. शरद चव्हाण यांनी केले. अतिथींचा परिचय प्रा. डी. के. कन्नोर यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. धनराज धनगर यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. रघुनाथ वाकळे यांनी मानले.
दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमास उपप्राचार्य शिवाजी गायकवाड, वरिष्ठ पर्यवेक्षक डॉ. अरूण वनारसे, कनिष्ठ पर्यवेक्षक प्रा. वैभव सोनवणे, कार्यालयीन अधीक्षक सुनील वाघ तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.