नाशिक जिल्हा शासकिय रूग्णालयाचे नाव दुसऱ्यांदा दिल्लीत पोहचले. २०१६-१७ साली पहिल्यांदा जिल्हा रूग्णालय केंद्र सरकारच्या ‘कायाकल्प’चे विजेते ठरले. त्यानंतर २०१८-१९ या वर्षातही जिल्हा रूग्णालयाने प्रथम क्रमांकाचे राज्यस्तरीय पारितोषिक पटकाविले. केंद्र सरकारच्या समितीने आठ ते दहा मुख्य निकषांच्या आधारे मुल्यांकन करत तब्बल ६०० गुणांपैकी गुणदान केले. यामध्ये जिल्हा रूग्णालयाने ९८ टक्के गुण मिळवून पुन्हा नाशिकचीआरोग्यसेवा राज्यासाठी आदर्श असल्याचे दाखवून दिल्याचे मत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे व्यक्त केले आहेत.
‘कायाकल्प’मध्ये प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी नेमका आराखडा कसा आखला?सातारा जिल्हा रूग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सकपदी असताना कायाकल्प योजनेचे २०१५हे पहिले वर्ष होते. यावेळी सातारा जिल्हा रूग्णालयाला मी प्रथम क्रमांक मिळवून दिले होते. हा अनुभव पाठीशी होता, नाशिकमध्ये बदलून आल्यानंतर नाशिकच्या जिल्हा रूग्णालयालाही ‘कायाकल्प’साठी पात्र करण्याचा निश्चय केला; मात्र हे मोठे आव्हान होते, कारण त्यावेळी नाशिकच्या जिल्हा रूग्णालयाची अवस्था सर्वच पातळीवर बिकट होती. त्यामुळे ‘कायाकल्प’च्या निकषांवर हे रूग्णालय खरे उतरविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार हे निश्चित. त्यादृष्टीने आराखडा तयार करून चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्ग-४पासून तर डॉक्टरांपर्यंत सर्वांना विश्वासात घेवून त्यांना ‘कायाकल्प’चे महत्त्व पटवून दिले. सहाशे गुणांचे मुल्यांकन असल्यामुळे प्रत्येक गुणाची बेरीज करण्याचा प्रयत्न जिल्हा रूग्णालयाच्या प्रत्येक घटकाने केला. त्यामुळे २०१६-१७ व १८-१९ या दोन वर्षांमध्ये या रूग्णालयाने प्रथम क्रमांक पटकाविला, ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे.
जिल्हा रूग्णालयामध्ये प्रामुख्याने सुरूवातीला कोणत्या त्रुटी आढळल्या?हो., त्रुटी नक्कीच होत्या. कारण जिल्हा रूग्णालयाच्या इमारतीची अवस्था सर्वप्रथम बिकट होती. इमारतीचे बांधकाम व आजुबाजूचा परिसर बकाल असल्याने ‘कायाकल्प’मध्ये रूग्णालयाचा प्रथम क्रमांक मिळवून देणे अवघड होते. कारण १०० गुण या निकषासाठी देण्यात आले होते. त्यामुळे इमारत व आजुबाजूचा परिसर विकसीत करणे प्रथम गरजेचे होते. तसेच स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर होता. सफाई कामगारांना मुबलक साहित्याचा पुरवठा होत नसल्याने स्वच्छतेचा दर्जा राखला जात नव्हता, त्यामुळे ही बाब तत्काळ लक्षात घेत त्यावर उपाययोजना केली. संपुर्ण रूग्णालयाच्या विकासासाठी स्वतंत्र्यरित्या अंतर्गत सहा समित्या व साठ उपसमित्या स्थापन करून प्रत्येक निकषानुसार त्रुटी दूर केल्या.
यंदाच्या निकालाचे काय वैशिष्ट्य राहिले?२०१६-१७च्या तुलनेत यंदाचा निकाल जास्त प्रभावशाली ठरला. कारण यावर्षी ‘कायाकल्प’मध्ये जिल्हा रूग्णालय अव्वलस्थानी येण्याबरोबरच जिल्ह्यातील ११ ग्रामिण रूग्णालयदेखील उत्कृष्ट ठरले हे विशेष! त्यामुळे रूग्ण कल्याण समितीच्या खात्यात केवळ ५० लाखाच्या ७५ टक्के नव्हे तर ६१ लाखांच्या ७५ टक्के इतकी रक्कम जमा होणार आहे. ११ ग्रामिण रूग्णालयांना प्रत्येकी एक लाख रूपयांचे बक्षीस कायाकल्पमधून जाहीर झाले आहे. राज्यातील उत्कृष्ट ठरलेल्या २५ ग्रामिण रूग्णालयांमध्ये ११ रूग्णालये नाशिक जिल्ह्याची आहेत, हे मुख्य वैशिष्ट्य. पहिले बक्षीस मिळाले तेव्हा, जिल्ह्यातील केवळ ३ ग्रामीण रूग्णालये उत्कृष्ट ठरले होते.जिल्ह्यातील अकरा उत्कृष्ट ग्रामीण रूग्णालय होण्याचा मान कोणाला मिळाला?यावर्षी कायाकल्पच्या मुल्यांकन स्पर्धेत नाशिक जिल्हा रूग्णालयासह अकरा ग्रामीण रूग्णालये उत्कृष्ट ठरले. यामध्ये त्र्यंबकेश्वर, कळवण, घोटी, निफाड, लासलगाव, नांदगाव, डांगसौंदाणे, दाभाडी, वणी, इगतपुरी, देवळा येथील ग्रामीण रूग्णालये उत्कृष्ट ठरली. कायाकल्प योजनेत समितीद्वारे २५ ग्रामीण रूग्णालये उत्कृष्ट म्हणून निवडण्यात आली. त्यामद्ये ११ ग्रामीण रूग्णालये नाशिक जिल्ह्यातील आहे.
- शब्दांकन : अझहर शेख,