नाशिक : बहुतांश देशांमधील संविधान राजाला, प्रेषिताला, देवाला अर्पण करण्यात आली आहेत. मात्र, भारताचे संविधान हे देशातील सामान्य जनतेला अर्पण करण्यात आले असून, त्याच्या हिताचा विचार करणारे आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने संविधान साक्षर होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी केले.
साहित्य संमेलन आयोजन समिती आणि नाशिक मनपाच्या वतीने संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला कालिदास कलामंदिरातील तालीम हॉलमध्ये संविधानविषयक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात माजी संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे हे ‘संविधान साक्षरता’ या विषयावर, तर माजी सनदी अधिकारी बी. जी. वाघ यांनी ‘मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये’ या विषयावर हे मार्गदर्शन केेले. यावेळी बोलताना कांबळे यांनी जनता, जात, धर्म, भिन्नता या मुद्द्यांमध्येच अडकून पडली असून, त्यातून जनतेने बाहेर पडण्याची गरज असल्याचे सांगितले, तर वाघ यांनी घटनेने आपल्याला मूलभूत अधिकार दिले असले तरी आपल्याला कर्तव्यांचा विसर पडतो, असे नमूद केले. प्रत्येक नागरिकाने अधिकाराबरोबरच कर्तव्यदेखील पार पाडली पाहिजेत, असेही वाघ यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय करंजकर उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान हिरे यांनी केले.