नाशिक : राज्य सरकारने दत्तक घेतल्याने नाशिक शहर स्मार्ट बनणार आहे. याशिवाय शहराचा विकास करण्यासाठी उद्योजक-व्यापारी अशा सर्वच घटकांचा सहभाग आवश्यक आहे. त्यातून बंद पडलेल्या फाळके स्मारकापासून वाहतूक समस्या सोडविण्यासह अनेक बाबतीत सुधारणा शक्य असल्याचे मत महापौर रंजना भानसी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अॅँड इंडस्ट्रिजच्या ४४व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महापौर रंजना भानसी बोलत होत्या. राठी सभागृहात आयोजित या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर उपमहापौर प्रथमेश गिते, चेंबरचे संस्थापक देवकिसन सारडा, माजी अध्यक्ष खुशालभाई पोद्दार तसेच चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष अनिल लोेढा आदि मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेण्याच्या केलेल्या घोषणेने नाशिककरांनी भाजपाला भरभरून साथ दिली. स्मार्ट सिटीमध्ये नाशिकचा अगोदरच सरकारने सामावेश केला आहे. परंतु आता अन्य विकासकामांसाठी उद्योजक आणि विकासकांनी पुढे यावे, त्यातून प्रमोद महाजन उद्यानासारखी अनेक उद्याने तयार होऊ शकतील तसेच बंद पडलेल्या फाळके स्मारकाची स्थिती सुधारण्याबरोबरच नवीन आकर्षणे शहरात उभी राहू शकतील, असे भानसी यांनी सांगितले. उपमहापौर प्रथमेश गिते यांनी चेंबरच्या सर्व कार्याला पाठबळ देण्याचे आश्वासन दिले.यावेळी भानसी आणि गिते यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार सारडा आणि पोद्दार यांच्या हस्ते करण्यात आला. हेमांगी दांडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सतीश बूब यांनी आभार मानले.
विकासासाठी हवी सर्वांची साथ
By admin | Published: March 25, 2017 12:25 AM