"सर्वांनाच कॅबिनेट मंत्री व्हायचेय, मंत्रिमंडळ विस्तार होणार कसा?"; काँग्रेसचा खोचक सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 06:15 PM2022-08-01T18:15:05+5:302022-08-01T18:18:31+5:30
नाशिक - राज्यात संविधानिक तत्त्वांची पायमल्ली करून सत्तांतर घडवून आणले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या सर्व ४० ते ...
नाशिक - राज्यात संविधानिक तत्त्वांची पायमल्ली करून सत्तांतर घडवून आणले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या सर्व ४० ते ५० आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले आहे. आता सर्वांचीच कॅबिनेट मंत्री होण्याची इच्छा असल्याने मंत्रिमंडळ विस्तार होणार कसा? असा खोचक सवाल उपस्थित करतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या बिनखात्याचे मंत्री आहेत, म्हणूनच ते माईक ओढून, चिठ्ठी देऊन तर कधी शर्ट ओढून सल्लागाराच्या भूमिकेत कार्यरत असल्याची बोचरी टीका काँग्रेसचे विधानसभा गटनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
नाशिक शहरातील तुपसाखरे लॉन्स येथे रविवारी (दि. ३१) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेत नाशिक शहर व ग्रामीण, तसेच मालेगाव शहर व ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार हिरामण खोसकर व नाशिक काँग्रेसचे सहप्रभारी ब्रीज दत्त, अतुल लोंढे, माजी नगरसेवक शाहू खैरे, प्रदेश उपाध्यक्ष शरद अहेर, माजी मंत्री शोभा बच्छाव, हेमलता पाटील, वत्सला खैरे आदी उपस्थित होते.
राज्यात विचित्र परिस्थितीत पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन करून सरकार स्थापन झाले आहे. या सरकारला महिना पूर्ण होऊनही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. कारण या सरकारला न्यायालयाच्या निर्णयाचीही भीती असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. राज्यात अतिवृष्टी आणि महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती असतानाही मंत्रिमंडळाचा विस्तार नसल्याने कोणत्याही जिल्ह्याला पालकमंत्री नाही, अशा परिस्थितीत राज्यातील सर्वसामान्य जनता विविध समस्यांनी त्रस्त असताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सातत्याने दिल्ली वारी करण्यात व्यस्त असल्याची खोचक टीका त्यांनी यावेळी केली.
बापाच्या आधी मुलगा निवृत्त-हेच अच्छे दिन का?
काँग्रेसच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेमुळे वडिलांच्या अगोदर मुलगा निवृत्त होणार असल्याचा दिवस देशातील जनतेला पहायला मिळणार असल्याची बोचरी टीका करतानाच हेच अच्छे दिन आहेत का? असा सवाल नाना पटोले यांनी केला. तसेच देशात व राज्यात महत्त्वाच्या विषयावरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी ईडीचा वापर होत असून शिवसनेचे नेते संजय राऊत यांना झालेली अटक त्याचाच भाग असल्याचा आरोपही पटोले यांनी केला.