नाशिक : मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत भाग घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तसे सुचित केले म्हणजे याचा अर्थ त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, असा होत नाही, अशी सारवासारव करतानाच, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी अप्रत्यक्ष पवार यांची पाठराखण केली आहे.
एका खासगी कार्यक्रमानिमित्त मंगळवारी (दि.२५) पटेल नाशिक येथे आले होते. त्यावेळी प्रसिद्धीमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढला पाहिजे, ही प्रत्येकाची इच्छा आहे. त्यामुळे आदी पक्षाला मोठे करा, असे सांगून राज्यात मुख्यमंत्री बदलाबाबत राजकीय चर्चा सुरू असली तरी, याबाबत मला काहीच माहीत नाही. ज्यांनी सरकार उभे केले, तेच याबाबत सांगू शकतील, असेही पटेल यांनी सांगितले.
राज्यातील सरकार कोसळल्यास भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येणार, अशा चर्चा सुरू आहेत. त्याबाबत बोलताना पटेल म्हणाले की, अशा चर्चा माध्यमांमध्येच सुरूच आहेत. तसेच याबाबत दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही स्वतंत्र बैठक झालेली नाही. मुंबईत पक्षाच्या नियमित बैठका होत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकजुटीने काम करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधले सर्व निर्णय हे शरद पवारच घेतात. जे काही करू ते आम्ही एकत्रिपणे करू. तुमच्या मनात जो काही विषय आहे, तो विषय आता पक्षासमोर नाही, असे सांगत आमच्याबाबत माध्यमामध्येच विरोधाचे सूर लावले जातात, असा टोलाही त्यांनी लगावला.