नाशिक : क्वॉरण्टाइन सेंटरमध्ये आलेल्या प्रत्येकाचे वय भिन्न असते. अगदी पंधरा वर्षाच्या शालेय विद्यार्थ्यापासून पंचाहत्तरीवरील आजोबांचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे आजार, त्याच्या व्याधी या भिन्न असतात. त्यामुळे क्वॉरण्टाइन सेंटरमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा दिवस सुरू होण्यापासून मावळेपर्यंत ज्या काही नाना त-हा इथे घडत असतात, त्या खरोखरच एका अर्थी गमतीशीर असतात. काही आजोबांचे गजर सकाळी५ वाजल्यापासूनच वाजू लागतात, त्यांना ते समजतही नसते. इतरांची मात्र झोपमोड होते. अखेरीस आजूबाजूचा कुणीतरी उठून ज्या आजोबांच्या पिशवीतून मोबाइल वाजत असतो त्यांच्या बाजूला जाऊन आजोबा तुमचा मोबाइल बंद करता का? असे म्हटल्यानंतर मग त्या आजोबांना लक्षात येते तोपर्यंत त्या गजराने आसपासच्या पाच सात जणांची तरी झोप घालविलेली असते. तर काही सूर्यवंशम कुळातले तरुण नास्ता येऊन दाखल होतो, तरीसुद्धा गाढ निद्रेतून बाहेर आलेले नसतात. सकाळचा नास्ता व प्रार्थनेनंतर आंघोळीसाठी जणू चढाओढ लागते. काहीची आंघोळ बुड बुड गंगा तर काहींची साग्रसंगीत अर्धा तास चालणारी असते.आंघोळ उरकून सारे आपापल्या जागी स्थानापन्न झाले की डॉक्टर आणि सिस्टर यांचा राउण्ड होतो. प्रत्येकाची आस्थेवाईकपणे चौकशी करून गरजेनुसार तत्काळ औषधी दिल्या जातात. एवढं सगळं उरकेपर्यंत दुपारच्या भोजनाची वेळ होते. भोजनानंतर बहुतांश जण दुपारची वामकुक्षी घ्यायला सरसावतात. तर काही मोबाइलप्रेमी यू-ट्यूब, फेसबुक आणि व्हॉट्सअपद्वारे स्वत:चे मनोरंजन करण्यात मग्न होतात. सायंकाळी पुन्हा एकदा प्रार्थना होऊन रात्रीचे भोजन येते. त्यानंतर रात्रीच्या निर्धारित गोळ्या घेतल्यावर अधिकृतरीत्या क्वॉरण्टाइन सेंटरमधील दिवस संपुष्टात येतो.-------------------------सकाळचा चहा-नास्ता झाला की मग नित्य प्रार्थना म्हटली जाते. प्रार्थनेनंतर जागीच उभे राहून करायचे व्यायाम सर्वांकडून करून घेतले जातात. त्यातदेखील काही तरुण आळशीपणा जोपासत थकल्याचा दिखावा करीत आरामाला प्राधान्य देतात. अखेरीस तरुणाईला बेडवरून खाली उतरवण्यासाठी योगा शिक्षकदेखील मग झिंगाटचा सहारा घेतात. एकदा झिंगाट वाजू लागले की मग आपोआपच सगळ्यांच्या अंगात ऊर्जा संचारते आणि प्रत्येक जण मनमोकळेपणाने नाचून घेतात.