नांदगाव : तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासात वडाळी खु, दहेगाव, वंजारवाडी, जळगाव बु. व कऱ्ही येथील ईव्हीएम मशीन तांत्रिक दोषांमुळे बदलावी लागली. पानेवाडी येथे मशीन पत्रिकेत उमेदवाराचे नावच नव्हते. ते नाव टाकल्यानंतर मतदान सुरु झाले. दरम्यान, तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आता ५४ ग्रामपंचायतींमधील ३८६ जागांसाठी ८७७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तालुक्यातील १८२ मतदान केंद्रांवर ८९,७९६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, त्यात ४७,५१२ पुरुष व ४२,२८३ महिला मतदारांचा समावेश आहे. यावेळच्या निवडणुकीत ठिकठिकाणी प्रस्थापितांना तरुणाईने आव्हान दिले असल्याने मतांची विभागणी अटळ असल्याचे चित्र दिसून येत होते. या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून १४ बस, २२ कुझर, ६ बोलेरो, ४ स्कूलबस, ११ तवेरा आदी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. तहसीलदार उदय कुलकर्णी, अपर तहसीलदार दयानंद जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रकिया सुरु आहे.
वाखारी येथे महिलांनी मतदानासाठी गर्दी केली होती.
. (१५ नांदगाव १)