सिन्नर : लोकसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणारी मतदान यंत्रे व व्हीव्ही पॅट तहसील कार्यालयात प्राप्त होवू लागली असून हे मशिन्स ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉँग रूमची पाहणी करण्यात आली.लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असून, संपुर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. तहसील कार्यालयाकडे कर्मचारी, अधिकाऱ्यांची वानवा असली तरी विविध शासकीय विभागातील कर्मचारी, अधिकारी निवडणूक कामासाठी तात्पुरते वर्ग करण्यात आले असून त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.सिन्नर विधानसभा मतदारसंघातील ३२९ मतदान केंद्रासाठी मतदान यंत्रासह इतर सर्व सामुग्री जिल्हाधिकारी कार्यालयातून पाठविण्यात येत आहे. ही सर्व सामग्री ठेवण्यासाठी तहसील कार्यालयाच्या शेजारी नव्याने उभारेलेल्या प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावरील दोन हॉलमध्ये स्ट्रॉँग रूम बनविण्यात आला आहे. सभागृहे निवडणूक यंत्रणेकडून ताब्यात घेण्यात आली असून स्ट्रॉँग रूमच्या संरक्षणाची जबाबदारी सिन्नर पोलीस ठाण्यावर सोपविण्यात आली आहे. इमारतीच्या व्हरांड्यात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.सभागृहाचे स्ट्रॉँग रूममध्ये रूपांतर करण्यासाठी पहिल्या लाकडी दरवाजापुढे लोखंडी पत्र्याचा मजबूत दरवाजे बसविण्यात आली आहेत. दोन्ही सभागृहांचे स्ट्रॉँग रूममध्ये रूपांतर झाल्यानंतर ईव्हीएम मशीनसह व्हीव्ही पॅटही या सभागृहामध्ये मांडून ठेवण्यात आले आहे.
सिन्नरला अधिकाऱ्यांकडून ईव्हीएम स्ट्रॉँग रूमची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 5:37 PM