गणेश धुरीनाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक अधिकच रंगतदार अवस्थेत पोहोचण्याची चिन्हे असून, या निवडणुकीत आता थेट मुख्यमंत्री आणि माजी पालकमंत्र्यांनी मोर्चेबांधणी केल्याने निवडणुकीत कोणाशी सरशी होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्ष पदासाठी हिरे पॅनल व कोकाटे-भोसले पॅनलने दावे-प्रतिदावे सुरू केलेले असतानाच आता ही निवडणूक थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात पोहाचली आहे. विशेष म्हणजे भाजपाचे कधी नव्हे ते सहा संचालक निवडून आल्याने जिल्हा बॅँकेवर सत्ता मिळविण्यासाठी भाजपाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मदत घेण्याची तयारी चालविली आहे. दुसरीकडे हिरे पॅनलसोबत सहलीला गेलेल्या दोेघा संचालकांसह कोकाटे-भोसले गटातील राष्ट्रवादीच्या एका संचालकाने काल (दि.३०) सकाळीच माजी पालकमंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांच्या भुजबळ फॉर्म येथे हजेरी लावल्याचे कळते. या हजेरीत हिरे पॅनलसोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या दोघा संचालकांना अध्यक्ष पदाबाबत भुजबळांकडून विचारणा झाल्याचे समजते. तसेच कोकाटे-भोसले गटाकडून निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या एका संचालकालाही यावेळी फॉर्मवर बोलविण्यात आले. त्यावेळी अध्यक्ष पदासाठी सर्वाधिक संधी कोणाला आहे, यावर चर्चा झाल्याचे समजते. हिरे पॅनलसोबत सहलीला गेलेले हे दोेन्ही संचालक आता पुन्हा सहलीला परत मुंबईला गेले नसल्याचे कळते.दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे माजीमंत्री राहिलेल्या जिल्हा बॅँकेच्या एका माजी संचालकांना दूरध्वनी करून हिरे पॅनलसोबत सहलीला गेलेल्या भाजपाच्या एका संचालकाला नाशिकला परत बोलविण्याबाबत चर्चा केल्याचे कळते. त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन संचालक नाशिकला परत आल्याने सहलीला गेलेल्या हिरे पॅनलच्या उर्वरित संचालकांचीही चलबिचल झाल्याची चर्चा आहे. माजी पालकमंत्र्यांनी जिल्हा बॅँकेवर राष्ट्रवादीचीच आणि त्यातही आपल्या समर्थकांची वर्णी लावण्यासाठी कंबर कसल्याची चर्चा आहे, तर मुख्यमंत्र्यांनीही भाजपाची सत्ता आणण्यासाठी रस घेतल्याने निवडणूक रंगतदार अवस्थेत पोहोचल्याचे चित्र आहे. असे असले तरी जिल्हा बॅँकेचा अध्यक्ष हा जिल्हा बॅँकेची पायरी चढता चढता ठरत असतो किंवा बदलत असल्याचा इतिहास असल्याने ३ जूनला नेमके काय? घडते, याची उत्सुकता वाढली आहे.
अध्यक्ष पदासाठी मुख्यमंत्र्यांसह माजी पालकमंत्र्यांनी घेतली उडी
By admin | Published: May 31, 2015 1:06 AM