मालेगाव मध्य : शहरातील कमालपुरा भागातील शेरअली चौकात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मदरशाच्या देणगीचा हिशेब देत नाही या कारणावरुन झालेल्या हाणामारीत दोन जण जखमी झाले. याप्रकरणी आजी - माजी आमदारांनी समर्थकांसह शहर पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. याप्रकरणी शहर पोलिसांत परस्परविरोधी दोन नगरसेवकांसह आठ जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.कमालपुरा भागात मदरशाच्या देणगीचा हिशेब देण्यावरून झालेल्या हाणामारीत नगरसेवक फारूखखान फैजुल्लाखान याने जाज अहमद मंजूर अहमद (४५) उर्फ ओटे पहिलवान, रा. कमालपुरा याच्या डोक्यावर तलवारीने हल्ला केल्याने तो जखमी झाला. एजाज अहमद यांच्यावर रात्री सामान्य रूग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यास अधिक उपचारार्थ धुळे येथे हलविण्यात आले. मोहंमद शोएब शब्बीर अहमद (२०) रा. कमालपुरा यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की काँग्रेस नगरसेवक फारूखखान फैजुल्लाखान, शाहरूखखान फैजुल्लाखान, आरीफखान फैजुल्लाखान व फैसल (पूर्ण नाव माहीत नाही) याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. विरोधी गटाकडून शेख मुजीब शेख जाकीर (२८) रा. कमालपुरा याने तक्रार दिली. त्यात मसूद (पूर्ण नाव माहीत नाही), तनवीर मेंबर, डॉ. अरशद व ओटे पहिलवान यांनी लाथाबुक्क्याने मारहाण केल्याचे म्हटले आहे.याप्रकरणी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल, नगरसेवक मुस्तकीम डिग्निटी, मो. आमीन मो. फारूख, हाजी युसुफ इलियास यांच्यासह समर्थकांनी रात्री शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून संशयित आरोपींना अटक करण्याची मागणी केली. त्यामुळे तणावसदृष्य परिस्थिती निर्माण झाली. पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक राजेंद्र देशमुख यांनी चर्चा करीत कुणालाही पाठीशी न घालता कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने तणाव निवळला.रविवारी दुपारी माजी आमदार आसीफ शेख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नगरसेवक व समर्थकांनी शहर पोलीस ठाण्याच्यासमोर ठिय्या मांडला. कुठलाही आधार नसताना नगरसेवक फारूखखान व त्यांच्या बंधूंवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी राजकीय दबावाला बळी पडता पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक नवले यांनी योग्य तपास करुन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी काँग्रेस नगरसेवक इसराईल कुरैशी, हाजी निहाल अहमद, विठ्ठल बर्वे, फरीद कुरैशी यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश होता.पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आरोपमदरशांच्या देणगीवरुन झालेल्या हाणामारीच्या प्रकारानंतर आजी-माजी आमदारांनी आपल्या पक्षांच्या नगरसेवक व समर्थकांसह पोलीस ठाण्यात गर्दी करीत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल व नगरसेवक मो. आमीन मो. फारूख यांनी उपअधीक्षक रत्नाकर नवले यांच्याशी चर्चेदरम्यान मागील काही दिवसांत शहरात अवैध व्यवसाय व गुन्हेगारीत वाढ झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आरोप केले. शहर पोलीस ठाण्यासमोर आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांचे समर्थक नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर माजी आमदार आसीफ शेख यांच्या समर्थकांसह नगरसेवकांनीही शहर पोलीसांसमोर धरणे आंदोलन केले. अखेर पोलिसांनी आजी - माजी आमदारांच्या समर्थकांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पोलीस ठाण्यासमोर आजी-माजी आमदारांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 11:02 PM
कमालपुरा भागातील शेरअली चौकात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मदरशाच्या देणगीचा हिशेब देत नाही या कारणावरुन झालेल्या हाणामारीत दोन जण जखमी झाले. याप्रकरणी आजी - माजी आमदारांनी समर्थकांसह शहर पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. याप्रकरणी शहर पोलिसांत परस्परविरोधी दोन नगरसेवकांसह आठ जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ठळक मुद्देमालेगाव : देणगीच्या हिशेबावरून हाणामारी; दोन जखमी, आठ जणांविरोधात तक्रार दाखल