नाशिक : रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधावपणे पाण्याचा टॅँकर चालविणाऱ्या भारतीय तोफखाना केंद्राच्या टॅँकरचालकाने वडनेरदुमाला येथे एका आठ वर्षाच्या सायकलस्वार मुलाला चिरडल्याची घटना शुक्रवारी (दि.२८) घडली. या घटनेत चिमुकला जागीच ठार झाला आहे. याप्रकरणी मुलाच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी संशयित टॅँकरचालक सिध्दालिंगप्पाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी, माजी सैनिक नायक सुशिलकुमार यादव यांचा आठ वर्षाचा मुलगा गगनदीपकुमार हा सायकलवरून आपल्या आई-वडिलांसोबत नॉर्थरेंजरोडने शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास दुध आणण्यासाठी जात होता. आई पायी जात असताना मुलगा काही मीटर अंतरावर त्यांच्या पुढे चालत असताना सिध्दालिंगप्पा हे आर्टीलरी सेंटरचे पाण्याचे टॅँकर (१३पी ०२८६४९ एल) घेऊन भरधाव जात असताना त्यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. यामुळे सायकलस्वार गगनदीपला टॅँकरची धडक बसली व तो खाली कोसळून टॅँकरच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघात आपल्या चिमुकल्याला रक्ताच्या थारोळ्यात बघून आई चंद्राप्रकाश यादेखील बेशुध्द होऊन पडल्या. या घटनेने त्यांना मोठा धक्का दिला असून त्यांचीही प्रकृती खालावल्याचे सुशीलकुमार यांनी सांगितले. गोटफार्मजवळ हा अपघात घडल्याचे सुशीलकुमार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सुशीलकुमार नुकतेच भारतीय सैन्यदलातून नायक पदावरून निवृत्त झालेले असून ते मुळचे बिहार येथील रहिवासी असून मागील काही वर्षांपासून ते नॉर्थ रेंजरोडवर (घर क्रमांक ४२८/९०) आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहे. या अपघातप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जी.एन.जाधव हे करीत आहेत.
तोफखान्याच्या टॅँकरखाली सापडून माजी सैनिकाच्या चिमुकल्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 5:51 PM
माजी सैनिक नायक सुशिलकुमार यादव यांचा आठ वर्षाचा मुलगा गगनदीपकुमार हा सायकलवरून आपल्या आई-वडिलांसोबत नॉर्थरेंजरोडने शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास दुध आणण्यासाठी जात होता.
ठळक मुद्देसायकलस्वार गगनदीपला टॅँकरची धडक बसली आई चंद्राप्रकाश यादेखील बेशुध्द होऊन पडल्या