अंदरसुल : येथील मातोश्री विठाबाई चव्हाण विद्यालयात २००७-०८ मध्ये दहावी झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनी हे नोकरी, शिक्षण, बदलीमुळे वेगवेगळ्या भागात विखुरलेले आहेत. मात्र या सर्व विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र येत आठवणींना उजाळा दिला. नोकरी, धंद्याच्या निमित्ताने बरेच विद्यार्थी घर, शहर, नातेवाईक आणि मित्रांपासून दुरावतात. त्यांना भेटण्यासाठी विशेष वेळ काढण्याची गरज भासते आणि मग सर्वांना एकदाच भेटता यावे यासाठी खटाटोप सुरू होतो. त्यामधूनच गेट टूगेदर ही संकल्पना एखाद्याला सुचते आणि मग गेट टूगेदरचा प्लॅन ठरतो. सन २००७ -०८ व सन २००९-१० या वर्षातील सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी आपण जीवनात कसा संघर्ष केला , सध्या काय करतो , सध्या कुठे आहे असे प्रश्न प्रत्येकाने एकमेकांना विचारले. कोणी डॉक्टर तर कोणी शिक्षक , कोणी व्यावसायिक तर कोणी राजकारणी...अशा प्रत्येकाने एकमेकांबद्दल आपुलकीने माहिती सांगितली. उपस्थितांचा सत्कार करून सर्वांनी एकत्रित छायाचित्र घेत एकमेकांचा निरोप घेतला.
माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 1:08 PM