दोन वर्षांच्या कामगिरीची नगर पंचायत निवडणुकीत परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 11:36 PM2021-12-11T23:36:30+5:302021-12-12T00:17:21+5:30

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीची तर भाजपने विरोधी पक्ष म्हणून बजावलेल्या भूमिकेची परीक्षा मतदार हे नगर पंचायत निवडणुकीत घेणार आहेत. स्थानिक मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जात असल्याचे म्हटले जात असले, तरी केंद्र व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीवरच स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार चालतो. त्यामुळे दोन्ही सरकारांकडून मिळालेला निधी, त्याचा विनीयोग, विकासकामे हे मुद्दे चर्चिले जातील. आघाडीत बिघाडी झाली असल्याने सरकारमध्ये एकत्र असलेले हे पक्ष एकमेकांविषयी काय बोलणार, याचीही उत्सुकता राहणार आहे.

Examination of two years performance in Nagar Panchayat elections | दोन वर्षांच्या कामगिरीची नगर पंचायत निवडणुकीत परीक्षा

दोन वर्षांच्या कामगिरीची नगर पंचायत निवडणुकीत परीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यात महाविकास आघाडी असूनही तिन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढण्याच्या तयारीत ; भाजपचे  "एकला चलो रे"देवळ्यात आघाडीची शक्यता

मिलिंद कुलकर्णी
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीची तर भाजपने विरोधी पक्ष म्हणून बजावलेल्या भूमिकेची परीक्षा मतदार हे नगर पंचायत निवडणुकीत घेणार आहेत. स्थानिक मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जात असल्याचे म्हटले जात असले, तरी केंद्र व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीवरच स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार चालतो. त्यामुळे दोन्ही सरकारांकडून मिळालेला निधी, त्याचा विनीयोग, विकासकामे हे मुद्दे चर्चिले जातील. आघाडीत बिघाडी झाली असल्याने सरकारमध्ये एकत्र असलेले हे पक्ष एकमेकांविषयी काय बोलणार, याचीही उत्सुकता राहणार आहे.
कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षांनी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. निफाड, कळवण, दिंडोरी, देवळा, पेठ व सुरगाणा या ५ नगर पंचायतींच्या निवडणुका २१ डिसेंबरला होत आहेत. राज्यात अभूतपूर्व स्थितीत महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची विधानसभा निवडणुकीत आघाडी होती, तर शिवसेनेने भाजपसोबत निवडणूकपूर्व युती केली असूनही साथ सोडत या आघाडीत सहभागी झाली. दोन वर्षे हे सरकार काम करत आहे. केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यालाही अडीच वर्षे झाली आहेत. या दोन्ही सरकारांच्या कामगिरीवर जनता समाधानी आहे का, याचा कल या निवडणुकीच्या माध्यमातून कळणार असल्याने या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. हा कल लक्षात घेऊन आगामी निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष रणनीती आखतील.
यापुढील निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवू, असे तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी जाहीर केलेले असले तरी स्थानिक पातळीवर मात्र वेगळा सूर लागलेला आहे. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गेल्याच आठवड्यात जागा वाटपाविषयी सन्मानजनक तोडगा निघाला तर आघाडी अन्यथा कॉंग्रेस पक्ष स्वबळावर लढायला तयार असल्याचे जाहीर केले होते. बहुतांश तालुकाध्यक्षांचे म्हणणेदेखील असेच होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आघाडीला अनुकूलता दाखवली असली, तरी हा निर्णय स्थानिक पातळीवर सोपवला आहे. शिवसेनेने स्वबळ अजमावायचे ठरवले असल्याने आघाडीचा विषयदेखील चर्चेत नाही. भाजपची कोणाशीही युती शक्य नसल्याने ह्यएकला चलो रेह्ण ही भूमिका राहील.

देवळ्यात आघाडीची शक्यता
सहापैैकी देवळ्यात महाविकास आघाडी होण्याची शक्यता दिसते. अर्थात १३ डिसेंबर रोजी माघारीची अंतिम मुदत असल्याने त्यानंतर चित्र स्पष्ट होईल. गेल्या निवडणुकीतदेखील याठिकाणी स्थानिक विकास आघाडीने वर्चस्व मिळविले होते. भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्यादृष्टीने ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. शिवसेनेचा उमेदवार ऐनवेळी पळवून त्यांनी भाजपच्या दोन जागा बिनविरोध करण्यात यश मिळविले आहे. याठिकाणी १३ जागांसाठी ४८ उमेदवार रिंगणात आहेत. पेठमध्ये शिवसेनेचे गेल्यावेळी प्राबल्य होते. यंदा मात्र आघाडीतील दोन्ही पक्ष, भाजप, माकप असे सेनेला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. १७ जागांसाठी ७३ उमेदवार भविष्य अजमावत आहेत. कळवणला राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे. आमदार त्याच पक्षाचे असल्याने स्वबळावर ही निवडणूक लढविण्याचा त्यांचा मनसुबा आहे. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपदेखील रणांगणात उतरला आहे. याठिकाणी १७ जागांसाठी ७१ उमेदवार रिंगणात आहेत. निफाडमध्ये भाजपची सत्ता आहे. मात्र, ही सत्ता आणण्यात मोठा वाटा असलेले राजाभाऊ शेलार यांनी भाजप सोडल्याने पक्षापुढे आव्हान आहे. १७ जागांसाठी ५८ उमेदवार येथे लढत आहेत. सुरगाण्याचा गड माकपाच्या ताब्यात आहे. तो कायम राखण्यासाठी प्रयत्न असतानाच चारही पक्ष तेथे ताकद लावत आहेत. दिंडोरीत कॉंग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र, आता दोन्ही पक्ष एकमेकांच्याविरोधात उभे ठाकण्याच्या तयारीत आहेत. १५ जागांसाठी ५४ उमेदवार रिंगणात आहेत. गेल्यावेळी प्रत्येक पक्षाकडे किमान एका नगरपंचायतीची सत्ता होती. ती कायम राखणे आणि त्यात वाढ करण्याचे मोठे आव्हान सगळ्यांपुढे आहे.

पक्षीय बलाबलाच्यादृष्टीने विचार केला तर राष्ट्रवादी व शिवसेनेकडे मंत्रिपद आहे. नरहरी झिरवाळ यांच्यारुपाने विधानसभेचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आहे. भाजपने केंद्रीय मंत्रिपद देऊन नाशिकला प्रतिनिधीत्व दिले आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीत हे तिन्ही पक्ष जोमाने प्रयत्न करतील. कॉंग्रेसची अवस्था अवघड आहे. एकमेव आमदार आहेत. बाळासाहेब थोरात यांच्याकडे पालकत्व असले तरी पक्षसंघटना मजबूत नाही. नेत्यांची तोंडे चार दिशेला आहेत. अध्यक्षपद, प्रदेश समितीवरील प्रतिनिधीत्व या मुद्यांवरून मतभेद वाढले आहेत. त्यामुळे कॉंग्रेसला तूर्त तरी स्वत:चा आवाज नाही. स्वबळ म्हटले तरी कसोटी आहे. मतदारांचा कल आगामी निवडणुकांची दिशा ठरविणार आहे.

 

Web Title: Examination of two years performance in Nagar Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.