सरदवाडी : सिन्नर तालुक्यातल्या सरदवाडी शिवारात वनविभागाच्या हद्दीतील पुरातन हनुमान मूर्तीची शिळा बाजूला सरकवून त्याखाली खड्डा खोदल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. वटसावित्री पौर्णिमेच्या आदल्या रात्री सदर प्रकार घडल्याने गुप्तधनाच्या लोभातून ही खोदाखोद झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. सदर जागा वनविभागाच्या हद्दीत असल्याने यासंदर्भात पोलिसांत तक्रार देण्यास कोणीही पुढे येत नसल्याचे चित्र आहे.नवव्या शतकात सिन्नरवर गवळी राजाचे राज्य असताना या भागात गवळी समाजाची वस्ती होती. त्याकाळी गवळीबांधवांनीच या मूर्तीची प्रतिष्ठापणा केल्याचे मानले जाते. वनविभागाच्या हद्दीतील डोंगरावर निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या हनुमान मूर्तीभोवती शिवलिंगाच्या आकारात पाषाण मांडलेले आहे. या ठिकाणापासून सिन्नर शहरातील प्रसिद्ध हेमाडपंती गोंदेश्वर मंदिरापर्यंत जाण्यास भुयारी मार्ग असल्याचे सांगितले जाते. सुमारे बाराशे वर्षांनंतरही सुस्थितीत असलेल्या हनुमान मूर्तीबाबत सामान्यांच्या मनात नेहमीच कुतूहल राहिले आहे. गुप्तधनाच्या लोभातून या परिसरात अनेकदा खोदकाम व अन्य अघोरी प्रकार झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. मात्र याकडे कोणीही फारसे गांभीर्याने बघितले नाही. त्यामुळे यावेळी थेट हनुमान मूर्तीच बाजूला सरकवून खोदाखोद करण्यात आली आहे. बुधवारी रात्री पौर्णिमा सुरु झाली व हा प्रकारही मध्यरात्रीच घडला असल्याची शक्यता आहे. घटनास्थळी उभे कापलेले लिंबू आढळून आल्याने गुप्तधनाच्या लोभापोटी सदर खोदाखोद झाल्याच्या संशयाला पुष्टी मिळत आहे. (वार्ताहर)
सरदवाडी शिवारात गुप्तधनाच्या लालसेपोटी खोदकाम?
By admin | Published: June 14, 2014 1:19 AM