नाशिक : प्रत्येक सजीवाला पाणी अत्यावश्यकच असते. किंबहुना म्हणूनच पाण्याला जीवन असे म्हणतात. मात्र, तेच पाणी जर प्रचंड अतिरिक्त प्रमाणात पिल्यास ते पाणी आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरते. त्यामुळे कुणी काही सल्ले दिले तरी शरीराच्या गरजेनुसार तहान लागल्यानंतर योग्य तेवढे पाणी पिणेच हितकारक ठरते.
सध्याच्या काळात व्हॉट्सअपवर आरोग्याच्या नावाखाली वाटेल तसे संदेश फिरत असतात. त्या संदेशांचे अनुकरण करणे किंवा त्यांना प्रमाण मानून त्याप्रमाणे आपल्या दिनक्रमात बदल करणे हे कधीकधी जीवावर बेतू शकते. कुठल्या व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये ५-६ लिटर पाणी आवश्यक सांगितले म्हणून पावसाळा, हिवाळा, उन्हाळा असे सर्व ऋतुंमध्ये तितकेच पाणी पिणे हे शरीरावर अत्याचार करणारे ठरते. कमी पाणी प्यायल्याने नुकसान होते, हे जितके खरे तितकेच अधिक पाणी पिल्यानेही ते आरोग्यासाठी अपायकारक ठरते, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
प्रत्येक व्यक्ती कोणत्या परिस्थितीत, कुठल्या हवामानात, कोणत्या कामाच्या स्वरूपात कार्यरत असते, त्यावर त्याच्या अन्नाची तसेच पाण्याची गरज अवलंबून असते. एखादा कामगार उष्णतेच्या ठिकाणी किंवा प्रचंड शारीरिक कष्टाच्या जागी काम करीत असेल तर त्याच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्याला जास्त पाणी प्यावे लागते. तसेच हगवण, उलट्या, होत असल्यासदेखील जास्त पाणी द्यावे लागते. त्या तुलनेत एसीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला कमी प्रमाणात पाणी प्यावे लागते.
इन्फो
जास्त पाणी प्यायले तर...
जेव्हा एखादी व्यक्ती अल्प कालावधीत जास्त पाणी पिते तेव्हा मळमळ, उलट्या आणि डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात. गंभीर परिस्थितीत मेंदू फुगू शकतो, यामुळे गोंधळ, फिट येणे, कोमात जाणे अशा समस्या उद्भवू शकतात आणि अखेरीस मृत्यू देखील होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये रक्तातील मीठाची पातळी धोकादायक प्रमाणात कमी झाल्याचीही उदाहरणे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
इन्फो
प्रत्येकाच्या शरीराची पाण्याची गरज भिन्न असते. मात्र, सर्वसाधारणपणे पुरुषांच्या शरीराला तीन तर महिलांच्या शरीराला अडीच लिटरपर्यंत पाण्याची गरज असते. मात्र, स्थळ-काळानुसार त्यात बदलदेखील शक्य आहे. मात्र, कुणी प्रचंड प्रमाणात नियमितपणे पाणी पित असेल तर अशा व्यक्तींच्या शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होण्याचादेखील धोका असतो.
चौकट
कुणी किती पाणी प्यावे?
० ते ६ महिने -केवळ मातेचे दूध पुरेसे
६ महिने ते १ वर्ष- २५० मिली.
१ ते ३ वर्ष - १ लिटर
४ ते ८ वर्ष- १.२ लिटर
९ ते १३ वर्ष - १.८ लिटर
१४ ते १८ वर्ष- २.५ लिटर
१८ वर्षावरील - ३ लिटर