नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे नूतन अध्यक्ष म्हणून अपेक्षेप्रमाणे न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी पदभार स्वीकारला. प्रतिष्ठानचे कार्य अधिकाधिक व्यापक करीत त्याच्या कार्यकक्षा रुंदावण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यात विविध भाषांचे मराठीशी आदान-प्रदान व्हावे, यासाठी काही भरीव कार्य करण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला. भाषाभगिनींना बळ देण्याचे अध्यक्षांचे हे सर्व विचार प्रागतिक आणि कौतुकास्पद आहेत. मात्र, भाषाभगिनींच्या कार्यबाहुल्यात अडकून प्रतिष्ठानच्या कार्याची दिशा ‘माय मरो, मावशी जगो’ या दिशेने होणार नाही, याची दक्षता त्यांना घ्यावी लागणार आहे. किंबहुना आपली मराठी ‘माय जगो’ तिचा जनमानसातील आणि पुढील पिढीतील वापर व प्रभाव वाढो या दिशेने अधिक जोमाने कार्य करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे.प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदाची निवड शनिवारच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. न्या.चपळगावकर यांच्याकडे दीड दशकापूर्वी प्रतिष्ठानवर विश्वस्त म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांना प्रतिष्ठानच्या कामकाजाचे पूर्वीपासूनच बऱ्यापैकी आकलन आहे. मात्र, या दीड दशकांच्या कालावधीत समाजात वेगाने झालेले बदल, मराठी भाषेपुढे निर्माण झालेली नवीन आव्हाने आणि त्यामुळे प्रतिष्ठानसमोरील आव्हानांचे बदलते स्वरुप या सर्व बाबींचा विचार त्यांना अग्रक्रमाने करावा लागणार आहे. पदभार स्वीकारल्यानंतर चाकोरीबाहेरील कार्य करण्याचा मनोदय त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत आणि त्यानंतर पत्रकारांशी झालेल्या संवादातदेखील व्यक्त केला. त्यात उर्दू भाषेशी निगडीत कार्याला प्रतिष्ठान चालना देत असल्याबाबत समाधान व्यक्त करतानाच कानडी भाषेबाबतही आदान-प्रदान वाढविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. या अन्य भाषाभगिनींबाबत विचाराचे स्वागतच आहे. मात्र, त्या प्रेमात आपल्या मूळ ध्येयापासून भरकटण्याचा धोका अधिक भासतो.कुसुमाग्रजांचे मराठी साहित्यातील उत्तुंग योगदान लक्षात घेऊनच त्यांचा जन्मदिन हा राज्यभरात मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. मग त्यांच्या नावाने चालणाºया प्रतिष्ठानने मराठी हाच केंद्रबिंदू मानून तिचाच विविधांगी प्रसार कसा करता येईल, याचाच ध्यास घेणे अपेक्षित आहे. अन्य भाषांच्या संवर्धन आणि प्रसारासाठी त्या-त्या भाषांसाठी काम करणाºया संस्था, संघटना आहेत. त्यामुळे प्रतिष्ठानच्या कार्याचा केंद्रबिंदू हा मराठी भाषा संवर्धन आणि तदनुषंगिक उपक्रम असाच असावा. केवळ वास्तू उपलब्ध आहे, म्हणून हाती गवसेल त्या उपक्रमांचे आयोजन करणे हे प्रतिष्ठानचे ध्येय नसावे.नूतन अध्यक्ष निवडीतील सर्वाधिक जमेची बाजू म्हणजे न्या. चपळगावकर यांनी दर दोन-तीन महिन्यांनी प्रतिष्ठानच्या कामाचा आढावा घेण्याच्या निमित्ताने नाशिकला भेट देण्याचा निर्धार जाहीर केला आहे. त्यामुळे किमान निर्धारित कार्याचा नित्यनेमाने पाठपुरावा घेतला जाईल, अशी आशा आहे. परंपरेला छेद देत नवी परंपरा निर्माण करणे हेच प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचे बंड असते, असे विचार मांडणारे ज्ञानपीठप्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या विचारांशी नाते सांगणाºया न्या. चपळगावकर यांचा कार्यकाळ हा नवीन चांगल्या परंपरा निर्माण करणारा, मराठी भाषा वर्धिष्णू होण्याच्या दिशेने वाटचाल करतानाच प्रतिष्ठानच्या नावलौकीकात भर घालणारा ठरावा, हीच साहित्यप्रेमींची अपेक्षा आहे.पाचवे अध्यक्षपद अन् योगायोगकुसुमाग्रज प्रतिष्ठानला यापूर्वी लाभलेल्या अध्यक्षांमध्ये प्रख्यात आर्किटेक्ट ग. ज. म्हात्रे (१९९० ते १९९५), दुसरे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी (१९९५ ते २००४), तिसरे अध्यक्ष प्रख्यात दिग्दर्शक जब्बार पटेल (२००४ ते २०१४), तर मावळते चौथे अध्यक्ष म्हणून साहित्यिक मधु मंगेश कर्णिक (२०१४ ते २०१९ ) यांनी धुरा सांभाळली होती, तर पाचव्या अध्यक्षपदाचा मान पुन्हा एकदा माजी न्यायाधीश असलेल्या न्या. चपळगावकर यांना मिळाला आहे. विशेष योगायोग म्हणजे यंदाचे मराठी साहित्य संमेलनदेखील मराठवाड्यात उस्मानाबादला होत असून, कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदाचा मान मूळचे बीडचे आणि सध्या औरंगाबाद निवासी असलेल्या मराठवाड्यातील न्या. चपळगावकर यांच्याकडे आला आहे.
आदान-प्रदान चांगलेच, मात्र ‘माय जगो’ला हवे प्राधान्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 1:11 AM