येवला : चिचोंडी शाळेत अवतरले स्वातंत्र्यसेनानी, देव, नेते, कलाकार... जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा अभिनव उपक्र म; आनंद मेळाव्याचे आयोजन... कुणी कीर्तनकार.. कुणी राजस्थानी पेहरावात.. कुणी जय मल्हार मालिकेतील खंडेराय, तर काही विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित नेहरू, सावित्रीबाई फुले... तर काही चित्रपटातील कलाकारांच्या वेशभूषा करून थेट व्यासपीठावर अवतरले. मेळाव्याचे... शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा तसेच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान हे मिळाले पाहिजे, या उद्देशाने चिचोंडी बुद्रुक (ता. येवला) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन केंद्रप्रमुख वासुदेव खैरनार, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांच्या हस्ते सरस्वतिपूजन करून करण्यात आले. मेळाव्यामध्ये पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल उभारले होते. यात विद्यार्थ्यांनी शेतमालाच्या विक्रीपासून ते किराणा माल, खाद्यपदार्थ, गोळ्या-चॉकलेटची स्टॉल उभारून विक्री केली. लहानपणापासून विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने हा अभिनव उपक्र म राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी यावेळी ट्रॅडिशनल पेहराव केले होते. यात राजकारण्यांपासून ते समाजसुधारकांपर्यंतचे पेहराव विद्यार्थ्यांनी केले होते. चौथीचा विद्यार्थी पीयूष पाटील याने केलेला खंडेरावाचा पेहराव सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर विद्यार्थ्यांच्या चमचा-लिंबू, संगीत खुर्ची, तीन पायांची शर्यत, धावण्याची शर्यत अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात विजेत्या स्पर्धकास प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. दरम्यान, यावेळी शाळेच्या उपशिक्षक मीना शेवाळे यांचा नाशिक जिल्हा परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर झाल्यानिमित्त सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक रजनी पाटील, उपशिक्षक चंदर घारे, प्रशांत शिंदे, धनानंद सोनवणे, दशरथ शेळके, सुरेश वाघ, मीना शेवाळे आदिंनी प्रयत्न केले. (वार्ताहर)
चिचोंडी शाळेत आनंद मेळावा उत्साहात
By admin | Published: January 10, 2016 11:06 PM