लोकसभा निवडणुकीत लाखोंची मते घेऊन सत्ताधाऱ्यांनाही दखल घेण्यास भाग पाडणाºया वंचित बहुजन आघाडीचा उत्साह विधानसभा निवडणुकीत मात्र जिल्ह्यात कुठेच दिसून आला नाही. जिल्ह्यात आठ ठिकाणी वंचितच्या उमेदवारांनी निवडणूक लढविली मात्र त्यापैकी दिंडोरी आणि देवळाली मतदारसंघातील उमेदवारांनी १० ते १२ हजारांची मते घेतली पण त्यांचा प्रभाव कुठेही दिसून आला नाही.विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून वंचित आघाडीकडून कोण उमेदवारी करणार याविषयीची जिल्ह्यात चांगली चर्चा होती. विशेषत: आघाडी, युतीकडून संधी हुकलेले अनेक दिग्गज वंचित आघाडीच्या गळाला लागतील अशी शक्यता निर्माण झाली होती. किंबहुना काही नावांची चर्चादेखील पसरविण्यात आली. प्रत्यक्षात मात्र उमेदवारी जाहीर करण्यात विलंब झाल्याने ऐनवेळी निवडीची वेळ निघून गेल्याने मागणी केलेल्या उमेदवारांना तिकीट द्यावे लागले आणि जिल्ह्यात केवळ आठच उमेदवार त्यांना उभे करता आले. वास्तविक जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागांवर निवडणूक लढविण्याचे पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले होते; मात्र उमेदवारी जाहीर करताना विजयाचे निकष दुर्लक्षित करून जागा लढविणाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले आणि वंचित निवडणुकीला सामोरे गेली. प्रचारातील त्यांचा उत्साह मात्र दिसून आला नाही.लोकसभा निवडणुकीत २८ हजारांपेक्षा अधिक मते घेऊन देवळालीतून वंचितने चांगले वातावरण निर्माण केले होते; मात्र विधानसभा निवडणूक लढविण्यास येथून कुणीच तयार नसल्याने वंचितपूर्ण पेच निर्माण झाला होता. शहर आणि जिल्ह्यातूनही बºयाच नावांची चर्चा झाली मात्र ऐनवेळी नवख्या उमेदवारांच्या गळ्यात माळ टाकण्यात आल्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यापासूनची तयारी उमेदवारांना करावी लागली याचा फटका उमेदवारांना बसला. जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षाचे नेते अॅड. आंबेडकर यांची सभा ऐनवळी रद्द करण्यात आल्यामुळेदेखील कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. वंचितकडून प्रचाराचे कोणतेही नियोजन दिसून आले नाही, उमेदवारांना आपापल्या कुवतीनुसार प्रचार करावा लागला. त्यानुसार त्यांना मतेही मिळाली. लोकसभेत वंचितने ज्याप्रमाणे वातावरण निर्मिती केली होती त्या तुलनेत विधानसभेत त्यांच्यात उत्साह दिसून आलाच नाही. जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांची भूमिकाही स्पष्ट नसल्यामुळे उमेदवारांना ऐनवेळी स्वबळावर लढावे लागले. त्याचाच परिपाक म्हणून जिल्ह्यात वंचितला पाहिजे तेवढी चर्चा घडवून आणता आली नाही.
‘वंचित’चा दुणावलेला उत्साह विधानसभेत विरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 1:40 AM