नाशिक : शहरातील नाशिकरोड येथे सुरू असलेल्या उपधान तपामध्ये रविवारी गच्छाधिराज जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत दीक्षा सोहळा धार्मिक पद्धतीने पार पडला. उपधान तपातील साधकांची मंगळवारी (दि. २६) नाशिकरोड येथे शोभायात्रा काढण्यात येणार असून, बुधवारी (दि.२७) मोक्षमाळ कार्यक्रमाने उपधान तपाची सांगता होणार आहे.लॅमरोड बालगृहरोड येथील कलापूर्णम तीर्थधाममध्ये गेल्या ४७ दिवसांपासून गच्छाधिराज जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांच्यासह आचार्य, साधू-संत, साध्वी यांच्या उपस्थितीत उपधान तप सुरू आहे. मुंबई येथील ६३ वर्षांच्या मंजुलाबेन नेमावत व सुरत येथील १३ वर्षांची मोक्षाबेन शाह यांच्या दीक्षा समारंभानिमित्त शनिवारी सकाळी शोभायात्रा काढण्यात आली होती. रविवारी (दि.२४) गच्छाधिराज जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज, आचार्य भव्यभूषण सुरीश्वरजी महाराज, आचार्य भवनभूषण सुरीश्वरजी महाराज, आचार्य वज्रभूषण सुरीश्वरजी महाराज यांच्यासह जैन साधू, साध्वी यांच्या उपस्थितीत मंजुलाबेन व मोक्षाबेन यांचा दीक्षा सोहळा धार्मिक पद्धतीने पार पडला. दीक्षा समारंभानंतर मंजुलाबेन यांचे नाव मार्गदर्क्षिताश्रीजी म.सा. व मोक्षाबेन यांचे कारण्युप्रिया श्रीजी म. सा. असे करण्यात आले. यावेळी जैनबांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.आज नाशिकरोडला साधकांची शोभायात्राउपधान तपात सहभागी झालेल्या साधकांची शोभायात्रा मंगळवारी (दि.२६) सकाळी साडेआठ वाजता आर्टिलरी सेंटररोड जैन मंदिरापासून निघणार आहे. शोभायात्रा अनुराधा चौक, बिटको, शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळा, सुभाषरोड, अनुराधा चौकमार्गे आर्टिलरी सेंटररोड, गाडेकर मळा येथील मनपाच्या मैदानापर्यंत काढण्यात येणार आहे.सायंकाळी ६ वाजता कलापूर्णम तीर्थधाममध्ये संध्या महापूजा, स्त्रोत भक्ती कार्यक्रम होऊन त्यानंतर आयोजक व साधक कुटुंबीयांचा सत्कार केला जाणार आहे. बुधवारी मोक्षमाळ कार्यक्रमाने उपधान तपाची समाप्ती होणार आहे.जैन समाजामध्ये ज्या कोणास दीक्षा घ्यायची असेल त्यास एक ते दीड वर्ष जैन साधू, साध्वी यांच्या सोबत राहून साधू जीवन नियमाप्रमाणे जगावे लागते. दीक्षा घेणाऱ्यांची गुरू परीक्षा घेतात. योग्यता वाटली तर संबंधिताच्या कुटुंबाची व दीक्षार्थीची परवानगी घेऊनच धार्मिक विधीप्रमाणे दीक्षा दिली जाते. दीक्षा घेतल्यानंतर पुढील संपूर्ण जीवन कुटुंब, नातेवाईक, संसारी जीवन आदी सर्वांचा त्याग करून गुरू सान्निध्यात राहून पवित्र आचार-विचार व तप, त्यागमय जीवन जगावे लागते. अहिंसेच्या पायावर आधारित या दीक्षा जीवनात स्वत:ला जगण्यासाठी एकाही व्यक्ती किंवा जीव-जंतूला कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही, हा दीक्षा जीवनाचा मूलमंत्र आहे.- मुक्तिभूषणजी विजयजी महाराज
नाशिकरोड येथे दीक्षा सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 1:21 AM