सटाणा : भगवान ऋषभदेवांच्या मूर्तीवर शुक्रवारी ( दि.१७ ) कीर्तीदिनी नाशिकचे राजाभाऊ पाटणी व परिवाराच्या हस्ते महामस्तकाभिषेक करण्यात आला. सकाळी ७ वाजता मुख्य यजमान तसेच त्यांच्या पत्नी त्रिशलादेवी, पुत्र महावीर व शीतल, सुना नीलम, सुवर्णा, नातवंडे अक्षय, रोहन, आदित्य, श्रेया, आयुषी असे तीन पिढ्यांचे सदस्य उपस्थित होते. पौरोहित्य हस्तिनापूरचे प्रधान आचार्य विजय जैन, सांगलीचे दीपक पंडित व सत्येंद्र जैन यांनी केले. महामंत्री संजय पापडीवाल यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी ऋषभदेवपूरम येथून सहभागी भाविक मोठ्या संख्येने पहाटेपासून पोहोचले होते. पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामीजींनी अर्घ्य समर्पण केले. त्यांनी कीर्तीदिनानिमित्त शुभाशीर्वाद दिले. वयोवृद्ध मुनी सिद्धांतकीर्ती यांनी मार्गदर्शन करताना सम्यक दर्शनासाठी श्रद्धा हवी तरच जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होईल, असे सांगितले.
व्यासपीठावर कार्याध्यक्ष अनिलकुमार जैन यांनी काल अभिषेकाचे नेतृत्व केले. महामंत्री संजय पापडीवाल अधिष्ठाता सी. आर. पाटील, कोषाध्यक्ष प्रमोद कासलीवाल, चंद्रशेखर कासलीवाल, राजेंद्र कासलीवाल, अशोक दोशी, हसमुख गांधी, प्रा. डी. ए. पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. शांतीधारेने अभिषेकाची सांगता करण्यात आली. स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. जीवनप्रकाश जैन यांनी केले. हस्तिनापूर येथून ऑनलाइन सहभागी झालेल्या आर्यिकारत्न डॉ. चंदनामती माताजी व गणिनिप्रमुख ज्ञानमती माताजींनी विश्वशांती प्रार्थना करून आशीर्वाद दिले.
चौकट
पुण्यातून येणार सायकलस्वार
रविवारी पुण्यातून पाच भाविक सायकलद्वारे प्रवास करून
मांगीतुंगी तीर्थ येथे दाखल होणार आहेत. प्रवासात ते
बीजारोपण करून पर्यावरण रक्षण, संवर्धन संदेश देतील. परिसरातील शेतकरी, नागरिकांना विविध प्रकारच्या बियांचे वाटप करतील.