मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे गुरु वारी (दि.४) नवीन खंडेराव महाराज यात्रोत्सवा निमित्ताने बारागाड्या ओढण्यात आल्या. येथील गौरव शेळके यांनी खंडेराव महाराज की जय, येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोषात बारागाड्या ओढण्यात आल्या.
मानोरी गावात इतिहासात पहिल्यांदाच यात्रेचे आयोजन करण्यात आल्याने गावात सकाळ पासूनच यात्रोत्सव साजरा करण्यासाठी घरोघरी गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. तसेच घरोघरी अंगणात सडा टाकून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच गावात ठिकठिकाणी पिवळ्या रंगाचे झेंडे लावण्यात आले होते. चार दिवस नवीन खंडेराव मंदिरात घटी बसलेल्या गौरव शेळके व देवाच्या सप्तरंगी काठीची गावातून संध्याकाळी चार वाजता ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करत भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली. तसेच बारागाड्या ओढण्यासाठी मानोरी ते मुखेड रस्ता काही वेळा पुरता रहदारीसाठी बंद करण्यात आला होता. संध्याकाळी महाप्रसादाच्या वाटप झाल्यानंतर रात्रभर जागरण गोंधळ कार्यक्र म आयोजित करून पहाटे लंगर तोडण्यात आला.यावेळी बाळासाहेब शेळके, संतोष आहेर, नंदाराम शेळके, दत्तात्रय शेळके, बाबासाहेब तिपायले, केदु साठे, सदु शेळके, संजय खैरनार, भाऊसाहेब फापाळे, शिवाजी भवर, मोठाभाऊ शेळके, दिनकर वावधाने, दिनकर तिपायले, विठ्ठल वावधाने, पंढरी तिपायले, बाळासाहेब गुंड, पुंजाराम शेळके, राजू शेळके, आनंदा गायकवाड, भास्कर चिने, शांताराम शेळके, आनंदा शेळके, अप्पासाहेब शेळके, मच्छिंद्र वावधाने आदींसह ग्रामस्थ यात्रोत्सवात सहभागी झाले होते.