संदीप झिरवाळ पंचवटीशेतमालाप्रमाणेच पान मळेकऱ्यांकडून वसूल केली जाणारी आडत आता व्यापाऱ्यांकडूनच वसूल करण्याचे आदेश बाजार समित्यांना प्राप्त झाल्याने त्यास पान खरेदीदार व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. याचा निषेध म्हणून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी व्यापाऱ्यांनी पान लिलावावर बहिष्कार टाकला. अखेर तडजोड म्हणून मळेकऱ्यांकडूनच आडत वसूल करण्यात आल्यानंतर तीन तासांनी लिलाव पूर्ववत झाले. पान मळेकऱ्यांनी विक्र ीसाठी आणलेला पुना (गावठी), नागवेली पानाच्या मालाचा आठवड्यातून केवळ बुधवारच्या दिवशी लिलाव या ठिकाणी होत असतो. आठवड्यातून एकच दिवस बुधवारी लिलाव होत असल्याने सांगली, सातारा तसेच कर्नाटक राज्यातून पुना व नागवेली पानाचा माल दाखल झाला होता; मात्र व्यापाऱ्यांनी मळेकऱ्यांकडून आडत वसूल करावी असे स्पष्ट करीत लिलावावर बहिष्कार टाकल्याने तब्बल अडीच तास लिलाव प्रक्रिया बंद पडली होती.शासनाने भाजीपाल्याप्रमाणेच पानमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून आडत वसूल करावी असे स्पष्ट केल्याने शासनाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचे ठरवून पुढच्या बुधवारी बेमुदत बंदची हाक दिली आहे. बुधवारी दुपारी मळेकऱ्यांनी पानमाल बाजारात आणला खरा; मात्र व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडल्याने मळेकऱ्यांना लिलाव सुरू होण्याची प्रतीक्षा करावी लागली होती. बाजारसमितीत बुधवारच्या दिवशीच पानाचे लिलाव होत असल्याने व त्यातच आवक ७०० ते ८०० पाट्या झाल्याने मळेकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पूर्वीप्रमाणे आजच्या दिवस मळेकऱ्यांकडून आडत वसूल करण्याचे ठरल्याने तीन तासांनी लिलाव सुरू झाले.
पान व्यापाऱ्यांचा लिलावावर बहिष्कार
By admin | Published: July 21, 2016 1:23 AM