नाशिक : न्यायालयाच्या विस्तारीकरण आणि अॅडव्होकेट चेंबरच्या स्थलांतर व विकसन धोरणाचे अधिकार बार असोसिएशनच्या कार्यकारिणीला देण्यात आले आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. नाशिक बार असोसिएशनची सभा अध्यक्ष अॅड. नितीन बाबूराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या शेजारील एच.आर.डी. सेंटरमध्ये पार पडली. यावेळी अर्थिक पत्रके आणि अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. त्यानंतर उच्च न्यायालयातील जनहित याचिकेच्या अनुषंघाने पोलीस मुख्यालयाची अडीच एकर जागा जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीकरणास मिळणार आहे. त्यामुळे या विस्तारीकरण आणि विकसन धोरण मंजुरीचे अधिकार बार असोसिशनच्या कार्यकारिणीला देण्यात आले. तसेच यावेळी झालेल्या चर्चेत काही वकिलांकडून समाज माध्यमातून आपल्याच वकील बंधूविषयी आक्षेपार्ह लिखाण करण्यात आल्याचा मुद्दा अॅड. का. का. घुगे यांनी उपस्थित केला व अशाप्रकारचे गैरवर्तन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून प्रसंगी गुन्हा दाखल करावा, अशी सूचना त्यांनी करताच उपस्थितांनी त्यांचे समर्थन केले. (प्रतिनिधी)
सर्वाधिकार कार्यकारिणीला !
By admin | Published: October 28, 2016 11:01 PM