मे महिन्यात शाळेतील निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शोधात इंग्रजी शाळांचे शिक्षक व कर्मचारी गावागावात जाऊन प्रवेश घेण्यासाठी आग्रह करत असतात. अनेक वर्षांचे चित्र यंदा मे महिना संपत आला तरी पहायला मिळत नाही. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कर्मचाऱ्यांना घरी येऊ देण्यास नागरिक अनुकूल नाहीत तसेच कर्मचारी देखील कोरोनाच्या भीतीने फिरत नसल्याने शाळांमध्ये सुरु असलेल्या विद्यार्थी मिळवण्याच्या रस्सीखेचला ब्रेक लागला आहे.
अनेक गावांत इंग्रजी माध्यमाच्या शाळा नाहीत. त्या गावातील मुले आजूबाजूच्या गावातील शाळेत प्रवेश घेतात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यापुढील काळात विद्यार्थ्यांचा प्रवास धोक्याचा ठरणार असल्याने पालकही दुसऱ्या गावात मुलांना पाठवण्याच्या मानसिकतेत नाहीत. अनेकांनी मराठी माध्यमांच्या जिल्हा परिषदांच्याच शाळांना पसंती देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे अनेक खासगी इंग्रजी शाळांची विद्यार्थी मिळवण्यात मोठी अडचण ठरणार आहे.
कोट....
मे महिन्याच्या सुरुवातीपासून मराठी शाळेत नवीन प्रवेश सुरु झाले आहेत. खानेसुमारी, गावातील दाखलपात्र विद्यार्थी यांच्या याद्या पूर्ण असून त्यांना दाखल करून घेत आहोत. कोरोनामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षक ऑफलाईन शिक्षण, गृहभेटी घेऊन शिकवतात. वर्षभर मुलांना मूलभूत शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पालकांचा कल जिल्हा परिषद शाळांकडे वाढला आहे.
सीमा चव्हाण, मुख्याध्यापक, सायखेडा