वणी : पावसाळ्यात सर्वसाधारण स्थितीत विद्युत पुरवठा अखंडित राहावा यासाठी पावसाळ्यापुर्वी होणाऱ्या दुरुस्तीला दररोज पडणाऱ्या पावसामुळे आडकाठी येत आहे. विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना धावपळ करावी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वणी येथे ३३ केव्हीचे विद्युत उपकेंद्र आहे. शहरी व ग्रामीण अशा दोन प्रकारांमध्ये विविध फिडरद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. पावसाळ्यापूर्वीच्या मेन्टेनन्समधे विद्युत जनित्रातील प्युज व्यवस्थित असावे, जनित्रापासुन विद्युत पुरवठा करणारी केबल क्षतिविरहित असावी थ्री फेज व सिंगलफेज पुरवठा होताना प्रमुख विद्युत वाहिनी एकमेकांमधील अंतर धोकादायक नसावे. विविध ठिकाणी कार्यान्वित असलेले एबी स्वीचच्या अवस्थेची तपासणी करणे तसेच विविध ठिकाणी असलेल्या झाडाच्या फांद्यामुळे वीजपुरवठ्यात होणारे अडथळे दूर करणे या व अशा अनेक तांत्रिक बाबींचा समावेश या मेंटेनन्समध्ये असतो. याची पूर्तता करणे अपेक्षित व आवश्यक असते. किंबहुना तशी भूमिका कंपनीची असते. पावसाळ्यात वादळी वारा, जोराचा पाऊस, खांब पडणे, वृक्षउन्मळून पडणे याचा परिणाम वीजपुरवठ्यावर होतो. अशावेळी विजेअभावी पाणीपुरवठा योजना, औद्योगिक क्षेत्र, विजेवर चालणारे विविध व्यवसाय यावर होतो. कर्मचारी व तांत्रिक ज्ञान असणारे मनुष्यबळ वेळेवर उपलब्ध होण्यावर मर्यादा पडत असल्याने विद्युत वितरण कंपनीची तारेवरची कसरत सुरू आहे.
काही कामांसाठी प्रामुख्याने रिप्लेसमेंटच्या कामासाठी एजन्सीमार्फत कामे करण्यात येतात व काही कामासाठी त्यांची मदत घेतली जाते .मात्र कोरोनाचा परिणाम यावर झाला असून, आता अनलॉक झाल्याने नमूद कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- मूळकर, सहायक अभियंता, वणी