टाकेद : इगतपुरी पंचायत समिती व तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने टाकेद येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित ४५ व्या इगतपुरी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप झाला. तालुक्यातील अस्वली येथील जनता विद्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या शाळेच्या उपकरणाची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे.इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथील न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयात ४५ वे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये अस्वली येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या शाळेतील विद्यार्थ्यांनी विनाविद्युत व प्रदूषणविरहित फ्रीज या उपकरणाची निर्मिती केली होती. इयत्ता सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक गटातून या उपकरणाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. या उपकरणाची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे. आठवीच्या वर्गात शिकत असलेल्या निकिता ज्ञानेश्वर गुळवे व आरती भिवा गुळवे या विद्यार्थिनींनी या उपकरणाची निर्मिती केली आहे. यशस्वी विद्यार्थिनींना मुख्याध्यापक एस.आर. जगताप, विज्ञानशिक्षक व्ही.बी. कुमावत, जी.एन. सहाणे, एस.के. साळुंके, आर.एस. बच्छाव आदींचे मार्गदर्शन लाभले. प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे, इगतपुरी पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी प्रतिभा बरडे, इगतपुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरण जाधव, उपसभापती भगवान आडोळे, पंचायत समिती सदस्य विठ्ठल लंगडे, मच्छिंद्र पवार, सोमनाथ जोशी, सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ तोकडे इगतपुरी तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक वर्ग आदींसह इगतपुरी तालुक्यातील बहुसंख्य शिक्षण, साहित्य, सांस्कृतिक कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 10:16 PM