लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघातील राजकीय समीकरणे व निवडणूक प्रचाराच्या मुद्द्याच्या आधारे उमेदवारांचे जय-पराजयाचे गणिते आखून सट्टेबाजार तेजीत आणणाऱ्या बुकींना एक्झिट पोलच्या निकालावरून मोठा झटका बसला आहे. ज्या उमेदवाराचा कमी भाव दाखवून बुकिंग घेतले जात होते, त्यांच्या विजयाची कोणतीही चर्चा एक्झिट पोलमध्ये न दर्शविल्याने व्यवहार थंडावला असला तरी, काहींनी मात्र याच एक्झिट पोलचा आधार घेत भाजपच्या उमेदवारांचे भाव कालपासून कमी करून टाकले आहेत.
निवडणुकीचा निकाल असो वा क्रिकेट स्पर्धा त्याची आवड असणाऱ्यांकडून छंद जोपासण्याबरोबरच त्याचा व्यवसाय म्हणूनही वापर केला जात असून, गुन्हेगारी जगतात त्यालाच मटका अथवा सट्टाबाजार म्हणून ओळखले जाते. निवडणूक प्रचारात घेतलेली आघाडी, जनमताचा कौल, राजकीय व सामाजिक समीकरणांचा विचार करता बुकींकडून काही ठराविक उमेदवारांच्या जय-पराजयाची बोली लावली जाते. अशावेळी बुकींकडून दोन्ही बाजूंनी बुकी घेतली जाते. नाशिक जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघापैकी काही ठराविक मतदारसंघात जोरदार चुरस असल्याचे दर्शवून येवला, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य, सिन्नर, इगतपुरी या मतदारसंघासाठी प्रामुख्याने प्रारंभी सट्टाबाजार तेजीत होता. त्यातील नाशिक शहरातील तिन्ही मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांवर बुकींनी पैसे गोळा केले. त्यात सर्वांत कमी भाव असलेला उमेदवार हा हमखास निवडून येणारा म्हणून गणला जातो. त्यामुळे सिन्नरमध्ये सेना उमेदवाराचा १२ पैसे, इगतपुरीत २० पैसे, मध्यमध्ये भाजपा १२ पैसे असे भाव होते, तर नाशिक पश्चिम व पूर्व मतदारसंघात भाजप उमेदवारांचे दर ९० पैशांपर्यंत पोहोचले. मात्र सोमवारी मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल पाहता, बुकींचे अंदाजही कोलमडून पडले. त्यात ज्या उमेदवारांच्या नावावर सट्टा लावण्यात आला होता, त्याची चर्चा नसल्याने काहींची बुकी बंद करण्यात आली. त्यामुळे एक्झिट पोलनंतर सट्टा बाजारातील उलाढाल मोठ्या प्रमाणावर कमी झाली.