नाशिक : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील महिन्यात केला जाणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली.मंत्रिमंडळात नाशिककरांना संधी देण्याबाबत विचार करण्याचे सुतोवाचही त्यांनी केले. पक्षाच्या कार्यालयातील पत्रकार परिषदेत सोमवारी (दि.२३) दानवे यांनी ही माहिती दिली. रावसाहेब दानवे म्हणाले, नाशिक शहरातील करवाढीच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. याबाबत लवकरच बैठक होणार आहे. परंतु, नाशिककर त्रस्त असलेल्या करवाढीच्या मुद्द्यावर कोणतेही ठोस आश्वासन न देता या प्रश्नावर मौन बाळगण्याची भूमिका दानवे यांनी घेतली. दरम्यान, मे महिन्यात राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता असून, यावेळी नाशिकचाही विचार केला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. भाजपा महाराष्ट्रातही गुजरातच्या धर्तीवर पक्षाची बांधणी करणार असून, ८० हजार बूथ प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक बूथवर २५ युवकांची नेमणूक करण्यात येणार असून, त्यांच्यावर मतदार यादीचे समोरील व मागच्या बाजूला असलेल्या ६० मतदारांची जबाबदारी सोपविण्यात येणार असून, या युवकांना पेजप्रमुख म्हणून संबोधण्यात येणार असल्याची माहितीही दानवे यांनी दिली. यावेळी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, प्रवक्ते सुहास फरांदे, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, राहुल अहेर, संघटनमंत्री किशोर काळकर, ओबीसी अध्यक्ष विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष दादा जाधव आदी उपस्थित होते.प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठापक्षाने सरपंच पदापासून केंद्रीय मंत्री आणि आता प्रदेशाध्यक्षासारखी महत्त्वाची पदे सोपविली आहेत. त्यामुळे आपल्याला कोणत्याही पदाची अपेक्षा नसल्याचे बोलून दाखवतानाच पक्षाचा प्रदेशाध्यक्ष हा मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठा असल्याचे सांगत रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षांसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा राज्य सरकारवर अंकुश असल्याचे अप्रत्यक्षरीत्या स्पष्ट के ले.युतीबाबत चर्चा नाहीशिवसेनेसोबत युतीविषयी अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. भाजपा संघटनात्मक विचारधारेचा पक्ष असून युतीसारखा महत्त्वाचा निर्णय कोणताही एक नेता घेऊ शकत नाही. त्यामुळे युतीची चर्चा करण्यासाठी जाणार असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारल्याचे वृत्त केवळ माध्यमांनी तयार केले असून, सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांची वेळच मागितली नसल्याचा खुलासा रावसाहेब दानवे यांनी केला.
पुढील महिन्यात होणार मंत्रिमंडळ विस्तार : रावसाहेब दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:47 AM