सिंहस्थ चर्चासत्र : नाशिक वसंत व्याख्यानमालानाशिक : इतर तीनही शहरांपेक्षा नाशिकमधील सिंहस्थ आव्हानात्मक असून, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी रस्ते रुंदीकरणाबरोबरच मिरवणुकीच्या जुन्या शाहीमार्गाचे रुंदीकरण केले जाईल, अशी माहिती चर्चासत्रात देण्यात आली. नाशिक वसंत व्याख्यानमालेत आयोजित सिंहस्थ कुंभमेळा चर्चासत्रात ही माहिती देण्यात आली. या चर्चासत्रात विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी विलास पाटील, कुंभमेळा अधिकारी महेश पाटील, सहायक पोलीस आयुक्त पंकज डहाणे यांनी सहभाग घेतला. प्रारंभी जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दृकश्राव्य माध्यमातून विविध विभागांच्या खर्चाबाबत माहिती दिली. त्यात चारही ठिकाणच्या कुंभमेळ्याचे नियोजन कसे असते याची माहिती देत नाशिकच्या कुंभमेळ्याचे वेगळेपण सांगितले. या महिन्याच्या शेवटी केंद्रीय स्तरावरून येणार्या आपत्कालीन नियंत्रण यंत्रणेच्या अधिकार्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय २४०० कोटी रुपयांच्या खर्चात कोठेही निधीची कमतरता पडणार नसून सर्व विभागांना निधी देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी दिली.विभागीय आयुक्त एकनाथ डावले यांनी गोदा प्रदूषण रोखत ग्रीन कुंभ साजरा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती दिली. घाटाची लांबी वाढवून गर्दीवर नियंत्रण आणले जाईल, तसेच शहरातील मूलभूत प्रश्न सोडवून पायाभूत कामे उभारण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. सहायक पोलीस आयुक्त पंकज डहाणे यांनी शहरात येणार्या वाहतुकीचे नियोजन करण्याबरोबरच शहरात गर्दी आणि चेंगराचेंगरी होणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे सांगितले. शहरात येणार्या वाहनांना शहराबाहेर थांबवून तेथून त्यांना आत सोडण्यासाठी महामंडळाच्या बसेसचा वापर केला जाईल आणि बॅरेकेडिंग लावून त्या गर्दीवरही नियंत्रण ठेवले जाईल, असे सांगितले. त्यासाठी स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आवश्यक असल्याचेही डहाणे म्हणाले. महापालिकेचे शहर अभियंता उत्तम पवार यांनी शहरात येणार्या सुमारे तीन लाख साधूंसाठी राहण्याची तसेच पाण्याची सोय करण्याचे नियोजन तयार असल्याचे सांगितले. याबरोबरच शहरात त्या काळात पाणीपुरवठा कमी पडणार नाही याचीही काळजी घेतली जाईल, असे सांगितले. त्या काळात सुमारे १६ जलकुंभ कार्यरत असतील, असे सांगून शाही मिरवणुकीसाठी पारंपरिक मार्गाचे रुंदीकरण आणि नव्या मार्गाचा वापर, असे दोन्ही पर्याय विचाराधीन असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी मंडलेश्वर काळे, रवींद्र देव यांच्यासह अनेक नागरिकांनी सूचना मांडल्या. शंकर बर्वे यांनी आभार मानले.
जुन्या शाहीमार्गाचा होणार विस्तार
By admin | Published: May 18, 2014 11:30 PM