अपेक्षा ठीक, अवाजवी अवसान काय कामाचे?
By किरण अग्रवाल | Published: July 28, 2019 12:58 AM2019-07-28T00:58:58+5:302019-07-28T01:05:28+5:30
राजकारणातील आत्मविश्वास कर्तृत्वाची व पक्षकार्याची जोड लाभलेली असली तर निवडणुकीतील दावेदारीलाही अर्थ लाभतो; पण त्याखेरीज मागण्या रेटल्या जातात तेव्हा त्याबद्दल आश्चर्य वाटून गेल्याखेरीज राहात नाही. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे नाशकातील चारपैकी तीन जागांची केलेली मागणीही तशीच म्हणता यावी.
सारांश
निवडणुकीच्या राजकारणात अपेक्षित तडजोडीसाठी अवास्तव मागण्यांनीच सुरुवात करायची असते हे खरे; पण तसे करताना प्रथमदर्शनीच आपले उसने अवसान अगर अपेक्षांमधला अतिरेक उजागर होऊन जाणार नाही याची काळजीही घेणे गरजेचे असते, अन्यथा तसे न करणा-याची संभावना अपरिपक्व नेतृत्वात झाल्याखेरीज राहात नाही. आघाडीअंतर्गत नाशकातील चारपैकी तीन जागांवर दावा ठोकणा-या शहर काँग्रेसच्या अध्यक्षांकडेही याच संदर्भाने बघता यावे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांमधील तयारीने वेग घेतला आहे. प्रदेशाध्यक्षांच्या खांदेपालटानंतर काँग्रेसही कात टाकून नव्या जोमाने निवडणुकीला सज्ज होऊ पाहते आहे. विशेषत: तरुणांना उमेदवारीची संधी देणार, असे नवे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पदभार स्वीकारताना सांगितल्याने तरुण फळीही मरगळ झटकून कामाला लागलेली दिसत आहे. याचदृष्टीने चाचपणी करण्यासाठी थोरात यांनी पहिलीच उत्तर महाराष्ट्र विभागीय आढावा बैठक नाशकात घेऊन तयारीचा जणू बिगूल वाजवला. या आढाव्यात परंपरेप्रमाणे ठिकठिकाणच्या नेतृत्वाकडून आपल्याकडे स्थिती चांगली व उमेदवारही सक्षम असल्याचे सांगितले गेले असता, ती स्थिती दाखवून देण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मेळावे घेण्याचे थोरात यांनी सुचवले. त्यामुळे त्यातून इच्छुकांची व स्थानिक नेतृत्वाच्याही संघटनात्मक कौशल्याची परीक्षाच घडून येणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे, या बैठकीत नाशिक शहरातील पक्षस्थितीचा आढावा सादर करताना शरद आहेर यांनी राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीअंतर्गत चारपैकी तीन मतदारसंघ काँग्रेसला अनुकूल असल्याचे सांगितल्याने खुद्द पक्षातीलच नेते-कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले असावेत. शहरातील पक्षाची नाजूक अवस्था, प्रसंगी समांतर काँग्रेस चालविण्यासारखे झालेले प्रयत्न डोळ्यासमोर असतानाही तीन मतदारसंघांत सक्षमतेचा आत्मविश्वास बाळगणे खरेच कौतुकास्पद म्हणायला हवे. मध्यंतरी म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेले विशेष कार्यक्रम, मेळावे आदींमुळे चांगले वातावरण निर्माण झाले होते; परंतु स्थानिकांच्या निष्क्रियतेमुळे ते पुढे कायम राहू शकले नाही. सद्यस्थितीतील एकूणच राजकीय बिकटावस्थेत तर सर्वांनी एकदिलाने पक्षकार्य पुढे नेणे अपेक्षित असताना, महापालिकेतील इनमिन सहा नगरसेवकांत गटनेते पदाचा निर्णय स्वीकारला गेलेला नाही, अखेर पक्षश्रेष्ठींकडे डोळे लागले आहेत. स्मार्ट रोडच्या दिरंगाईबद्दल दोघांनी दोन ठिकाणी आंदोलने करून पक्षांतर्गत दुही चव्हाट्यावर आणून ठेवली. या अशा गटबाजीमुळेच काँग्रेस खिळखिळी झाली, नवीन कोणी पक्षात यायला तयार नाही; ज्यांनी आजवर पक्षाच्या जिवावर खूप काही मिळवले असे जुने नेते, पदाधिकारी पक्षाकडे लक्ष देताना दिसत नाहीत, तरी शहराध्यक्ष तीन जागांवर दावा ठोकत आहेत.
गेल्या २०१४च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीही स्वतंत्रपणे लढले होते. त्यावेळी नाशिक पश्चिम व देवळाली या दोन्ही मतदारसंघांत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अधिक मते घेतली होती. शहरातील चारपैकी एकाही ठिकाणी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार दुस-या क्रमांकावर राहू शकला नव्हता. अर्थात, हा झाला इतिहास. वर्तमानात खूप काही चांगली परिस्थिती आहे असे नाही. ‘युती’ पुन्हा फिस्कटलीच तर ‘आघाडी’ची मात्रा कामी येण्याची अपेक्षा करता यावी. नाही तर ‘युती’च्या उमेदवाराशी सक्षमतेने लढू शकणारी कोणती नावे आहेत काँग्रेसकडे? निवडणुकीचे व त्यातील उमेदवारीचे सोडा, साधा काँग्रेस कमिटीत मेळावा घ्यायचा तर उपस्थितीची चिंता नेतृत्वाला भेडसावते; म्हणून बैठका घेणेच बंद पडले आहे. अशी संघटनात्मक विकलांग अवस्था असतानाही लढायचे म्हणून चारपैकी तीन जागांवर दावे केले जात असतील तर स्वत:चीच नव्हे, आघाडीचीही फसगत होणे टाळता येऊ नये.
बरे, काँग्रेस व राष्ट्रवादीतील बोलणी दरम्यान असा दावा केला गेला असता तर एकवेळ तो दबावतंत्राचा भाग म्हणून समजूनही घेता आला असता. पण आपल्याच नेत्यांशी बोलताना हा अतिरेकी आत्मविश्वास प्रकटला गेला. तेथे जागांसाठी अशी एक वाक्यता दाखवणारे नेते पक्षकार्यासाठी किंवा आंदोलनासाठी का एकत्र येत नाहीत, हा यातील खरा प्रश्न आहे. तेव्हा अधिक जागांवर दावेदारी करताना अगोदर सक्रिय होत पक्षाला मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जाणे गरजेचे ठरावे.