नाशिक : केंद्रीय विद्यापीठ आयोगाद्वारे मुक्त विद्यापीठांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम बंद करण्याची सूचना केल्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील अडचणीत आलेला कृषी पदवी अभ्यासक्रम आता पुन्हा सुरू होण्याच्या अपेक्षा मावळल्या आहेत. ही अडचणीत आला
दुरस्त शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांनी कृषी अभ्यासक्रम बंद करण्याची सूचना यूजीसीने केल्यानंतर दोन वर्षांपासून विद्यापीठात या अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेशप्रक्रिया बंद करण्यात आली आहे. परंतु, यूजीसीने केलेली सूचना निराधार असून, मुक्त विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळी राज्य सरकारकडून कायदेशीर तरतूद करून विद्यापीठात कृषी अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला असल्याचा दावा करीत यूजीसीने केलेल्या सूचनेच्या विरोधात मुक्त विद्यापीठातर्फे अखिल भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे विद्यापीठाने अपील केले होते. परंतु, मागील दोन वर्षांत विद्यापीठाला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्याचप्रमाणे विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन यांनीही राज्यातील राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांसोबत चर्चा करून कृषी अभ्यासक्रम वाचविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यातही विद्यापीठाला यश मिळू शकले नाही. त्यामुळे अखेर विद्यापीठात कृषी अभ्यासक्रम पुन्हा सुरू होण्याच्या अपेक्षा मावळल्या आहेत.
कृषी पदवी अभ्यासक्रम नियमित सुरू राहण्यासाठी विद्यापीठाने पुरेपूर प्रयत्न केले. परंतु, राष्ट्रीय संस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे विद्यापीठाची निराशा झाली आहे. मात्र, विद्यापीठाने कृषी क्षेत्राला पूरक प्रशिक्षण सुरू ठेवले असून, यात पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रमांवर लक्ष केंद्रित केले आहे. यात मधुमक्षिका पालन, ऑर्गनिक फार्मिक, हॉर्टिकल्चर, बी कीपिंग , गार्डनिंग, फूड प्रॉडक्शन सारखे ८ डिप्लोमा व ६ प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू असून, सुमारे १९ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
- प्रा. ई. वायुनंदन, कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ