नाशिक : लॉकडाऊन शिथिल होताच शहर व परिसरात नागरिकांच्या घरांसमोरून दुचाकी चोरी जाऊ लागल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. यामुळे शहर गुन्हे शाखाही सतर्क झाली. युनीट-१चे पथक महामार्गावर गस्तीवर असताना आडगाव पोलीस ठाणे हद्दीत दोघे युवक संशयास्पदरित्या पल्सरसह आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत कसून चौकशी केली. ते दोघे अट्टल दुचाकीचोर असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडून चोरीच्या पाच लाखांच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले.याबाबत अधिक माहिती अशी, दुचाकी चोरांच्या शोधात गुन्हे शाखा युनीट-१चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ हे पथकासोबत गस्तीवर होते. आडगाव पोलीस ठाणे हद्दीत उड्डाणपुलालगत एका ढाब्यासमोर संशयित संदीप नामदेव पवार (१९,रा. नवेगाव, ता.सटाणा), अंकुश अनिल सावंत (२४,रा.निंबोळा, ता.सटाणा), हे दोघे संशयास्पदरित्या हालचाली करत व अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत आढळले. वाघ व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना हटकले आणि पल्सर दुचाकींचे कागदपत्रे मागीतली यावेळी त्यांनी कागदपत्रे नसल्याचे सांगितल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यामुळे या दोघांना पथकाने दुचाकींसह ताब्यात घेत थेट गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेले. तेथे त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या ताब्यातील पल्सरवर (एम.एच.४१ बीए ०६३१) जाऊन पवननगर येथील एका घरासमोर उभी असलेली दुसरी पल्सर (एम.एच१५ जीजे ४५६८) संगनमताने दोघांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याविरूध्द दुचाकीचोरीचा गुन्हा अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला व त्यांची कोठडी मिळविल्यानंतर गुन्ह्यात वापरलेल्या पल्सरसह अन्य तीन पल्सर व एक एफझेड अशा चार दुचाकी पुन्हा हस्तगत करण्यात आल्या. यामध्ये या सर्व दुचाकींपैकी केवळ एफझेड दुचाकी ओझर पोलीस ठाणे हद्दीतून तर उर्वरित सर्व अंबड पोलीस ठाणे हद्दीतून चोरट्यांनी लंपास केल्या होत्या. पोलिसांनी एकूण ४ लाख ८५ हजार रूपये किंमतीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या चोरट्यांकडून दुचाकीचोरीचे अन्य गुन्हेही उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.