नाशिक : गुरू या शब्दाला जीवनात अनन्यसाधारण असे महत्त्वाचे स्थान असते. मात्र, गुरूंनी आपले शिष्यत्व मान्य करावे, यासाठीदेखील पूर्वी साधना करावी लागत होती. अर्थात, त्यासाठी शिष्याने त्याचे शिष्यत्व सिद्ध करावे लागते. कोणत्याही शिष्याला सर्वप्रथम आपल्याकडे काहीच ज्ञान नाही, हे समजले पाहिजे. त्यानंतर त्याला आवश्यक ज्ञान कुठे मिळेल, त्याचा त्याने शोध घेतला पाहिजे. किंबहुना त्याला त्या ज्ञानाची ओढ लागली पाहिजे. तशी ओढ लागल्यावरच शिष्य गुरूंकडून अधिकाधिक ज्ञान मिळवू शकतो. माझी ही ज्ञानाची अभिलाषाच मला बिहारमधील मुंगेरपर्यंत माझे आध्यात्मिक गुरू परमहंस सत्यानंद सरस्वती आणि त्यांचे शिष्य परमहंस निरंजनानंद सरस्वती यांच्यापर्यंत घेऊन गेली. त्याकाळी गुरूंशी फारसे बोलण्याची पद्धत नव्हती. मात्र, ध्यानाची प्रक्रिया, षटचक्रध्यान यासह अनेक बाबी त्यांनी स्वत: शिकवल्या. त्याशिवाय गुरूंच्या पुस्तकांमधूनच अधिकाधिक ज्ञान मिळवत गेलो. त्र्यंबकेश्वरनजीक उभारलेल्या आश्रमालादेखील गुरूंनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी इथे पूर्ण विश्व येणार असल्याचे काढलेले शब्द काही वर्षांतच खरे ठरले. आतापर्यंत विश्वातील ११५ देशांमधील नागरिकांनी आश्रमाला भेट देऊन योगाभ्यास केला असल्याने एक प्रकारे त्यांचेच शब्द सार्थ ठरले आहेत.
-विश्वास मंडलिक, योगाचार्य
फोटो
२२मंडलिक गुरू