नाशिकरोड : गंगापूजनापेक्षा आत्मपूजन हे निश्चितच श्रेष्ठ आहे. तीर्थयात्रा करून जे पुण्य लाभते त्यापेक्षा अधिक पुण्य आत्मपूजनाने लाभते. त्यासाठी ध्यानधारणा व योग अभ्यास करून आत्मानंद अनुभवावा, असे प्रतिपादन संत परमानंद महाराज यांनी केले.आनंदनगर कदम लॉन्स येथे सद्गुरू जंगलीदास महाराज यांच्या उपस्थितीत झालेल्या सत्संग सोहळ्यात बोलताना संत परमानंद महाराज म्हणाले की, आत्मपूजनानेच आत्म्याची खरी ओळख निर्माण होते. जंगली महाराज आश्रमाच्या वतीने येत्या २३ आॅक्टोबरपासून राजस्थान तीर्थयात्रा आयोजित करण्यात आली असून, सद्गुरू माउलींसमवेत या तीर्थयात्रेत आत्मपूजेचा लाभ भाविकांना मिळणार आहे. या तीर्थयात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संत परमानंद महाराज यांनी केले. यावेळी समर्थ लक्ष्मीमाता यांनी ध्यानधारणेबद्दल भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी हभप ज्ञानेश्वर ठोंबरे, सुशील सोनार, कैलास सोनार आदिंनी भजने सादर केली. व्यासपीठावर सद्गुरू जंगलीदास महाराज, चतुरानंद महाराज, चित्रानंद महाराज, बंटी महाराज, श्रमसागर महाराज, विवेकानंद महाराज आदि विराजमान होते. सत्संग सोहळ्याचे प्रास्ताविक नाशिक जिल्हा आत्मामलिक सत्संग समितीचे अध्यक्ष निवृत्तीदादा बोडके यांनी केले. यावेळी धर्मदाय उपआयुक्त घुगे, मोहनराव शेलार, शंकर औशीकर, बाळानाथ सरोदे, भाबड सर, अॅड. अरुण माळोदे, अनिल मोराडे, रायाजी शिंदे, दिनेश भदाणे, सुनील वाघ, धनंजय बनकर, कुटे आदि उपस्थित होते.
ध्यानधारणा, योग अभ्यास करून आत्मानंद अनुभवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 1:09 AM