नाशिक : माझे गुरु पं. मधुसूदन कानेटकर हे उस्ताद अल्लादियाखॉंसाहेब यांचे चिरंजीव भुर्जीखाँसाहेब यांचे गंडाबंद शिष्य होते. मात्र, त्यांच्यासाठी संगीत हे त्यांचे प्रोफेशन कधीच नव्हते. आकाशवाणीत विविध ठिकाणी कार्यरत असतानाही त्यांनी एकाहून एक सरस दिग्गजांकडून काही ना काही आत्मसात केले. संगीत हा केवळ त्यांच्या आत्मानंदाचा भाग होता. संगीतातील नवनवीन चीजा, राग शिकून त्यासाठी अखंड मेहनत घेणे, त्याचे मर्म समजून घेण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. संगीतावर निरातिशय आणि निरपेक्ष प्रेम कसे असते, ते मी त्यांच्याकडूनच अनुभवले आहे. संगीत शिक्षण हेदेखील त्यांनी कुणाकडून दमडीचीही अपेक्षा न बाळगता दिले. मात्र, तसे करतानाही त्यांनी कधी काही हातचे राखून ठेवले नाही. आम्हा सर्व शिष्यांनादेखील त्यांनी संगीतातील सारं काही आत्मसात करण्याची प्रेरणा दिली. त्याकाळी नवीनच आलेल्या इंटरनेटवर कोणत्या रागाची काय माहिती आहे, कुणी कसं गायलंय तेदेखील जाणून घेण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले. गाणं हे गणिती असू नये. श्रोत्यांना रागदारी समजत नसली तरी तुमचं गायन हे श्रोत्यांच्या मनाला हात घालणारं असलं पाहिजे, हे त्यांनी आमच्या मनावर कोरलं आहे.
----
मंजिरी असनारे-केळकर, प्रख्यात शास्त्रीय गायिका
----------------
गुरुपौर्णिमा विशेष
फोटो
२२केळकर-कानेटकर
--------------------