नाशिक : महापुरुषांच्या मार्गाचे अनुकरण करताना सर्वसामान्यांना दैवी साक्षात्काराची अनुभूती होते. हीच अनुभूती वासुदेवानंद सरस्वती महाराज यांनी दाखविलेल्या मार्गावरून चालताना होते. त्यांचे जीवनकार्य हे मनुष्य कल्याणासाठीच होते. त्यामुळेच जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी संत व महापुरुषांच्या मार्गाचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पंडित विवेकबुवा गोखले यांनी केले.परशुराम साईखेडकर सभागृहात सोमवारी (दि.२८) संस्कृत भाषा सभा नाशिकतर्फे सुधाताई बेळे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी वासुदेवानंद सरस्वती व टेंबे महाराज यांची साहित्य संपदा या विषयावर विवेकबुवा गोखले यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, परमार्थ या विषयाची संकल्पनेबाबत ते सामान्य व्यक्ती अज्ञान असतात. मात्र, दत्त महाराजांचे मुक्त भक्त असलेले वासुदेवानंद सरस्वती महाराज हे यांनी संस्कृत भाषेत साडेतीन हजार श्लोकांचे दत्तपुराण रचले. वाराणसी येथे गेल्यावर त्यांनी गंगेची प्रार्थना करताना गंगाष्टक लिहिले. मध्य प्रदेशातील पेटला येथे दत्तलीलामृत हा संस्कृत भाषेतील ग्रंथ लिहिला. वासुदेवानंद सरस्वती महाराज हे अधिकासिद्ध पुरुष असल्याचे त्यांनी सांगितले. संस्कृत भाषा सभा संस्थेच्या वतीने सुधाताई बेळे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार वैद्य डॉ. अभिजित सराफ यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या वतीने त्यांचे बंधू डॉ. आनंद सराफ यांनी हा पुरस्कार स्वीकारला. शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
महापुरुषांच्या मार्गानुक्रमाने अनुभूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 1:00 AM