गोदावरी नदीच्या शुध्दीकरणासाठी नियुक्त केलेल्या महापालिकेच्या उपसमितीची बैठक नुकतीच पार पडली. त्यात या विषयावर चर्चा करण्यात आली होती. महापालिकेच्या सध्याच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे आधुनिकीकरण करून बीओडी दहाच्या आत आणण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेने तयारी केली असली तरी त्यासाठी खर्चदेखील येेणार आहे. त्या पार्श्वभूमीवर लागणारा खर्च आणि वेळ बघता थेट प्रक्रिया केंद्रात ओझोनायझेशनची प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे बीओडी मर्यादित राहील असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.२२) कंपनीच्या संचालक आणि याचिकाकर्ता राजेश पंडित यांनी ही पाहणी केली. त्यानंतर महापालिकेचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे यांच्याकडे बैठकदेखील झाली. कंपनीने रीतसर पत्र देऊन महापालिकेची परवानगी घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे ठरवले.
दरम्यान, उपसमितीच्या बैठकीतदेखील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार महापालिकेच्या सर्व इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्याचे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटीच्या वतीने प्रोजेक्ट गोदा अंतर्गत सुरू असलेली कामे पाहण्यासाठी आर्किटेक्ट प्राजक्ता बस्ते यांच्यासमवेत प्रत्यक्ष पाहणी करण्याचे ठरवण्यात आले. त्याचप्रमाणे गोदावरीत प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पाेलीस पथक नियुक्त करण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे ठरवण्यात आले.