नाशिक : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व त्याप्रमाणात अपुरा पडत असलेला रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा पाहता रुग्ण दगावण्याच्या वा अत्यवस्थ होण्याच्या घटना वाढत असताना त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून केले जाणारे प्रयोगावर प्रयोगदेखील फसत असल्याचे दिसू लागले आहे. त्यामुळेच की काय, रेमडेसिविर काळाबाजाराला अद्यापही अटकाव बसू शकला नाही, परिणामी १० ते १५ हजारांपर्यंत त्याच्या किमती गेल्याने रेमडेसिविर व्यवस्थापन कोलमडून पडल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.
१५ मार्चपासून कोरोनाचा कहर वाढल्याने त्यावर उपाय म्हणून रेमडेसिविरची मात्रा यशस्वी असल्याचे पाहून वैद्यकीय क्षेत्राकडून त्याचा वापर वाढला. तत्पूर्वी रेमडेसिविरचा साठा पूर्णत: काही ठरावीक औषधी दुकानांकडे असल्याने त्यांच्याकडून ठरावीक रुग्णालये, मर्जीतील रुग्णांसाठीच त्याचा वापर केला गेला. परिणामी, मागणी व पुरवठ्यात तफावत होऊन त्यातून काळाबाजाराला वाव मिळाल्याने वाढत्या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने अगोदर अन्न व औषधी प्रशासन विभागाला त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या. मात्र, औषधी दुकाने व रुग्णालयांकडून त्याला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने स्वत:च त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी रुग्णालयांना थेट रुग्णांच्या नावानिशी रेमडेसिविरची मागणी ‘कोविड-१९’ नावाच्या संकेतस्थळावर नोंदविण्याच्या सूचना केल्या. एका दिवसात सर्व कोविड रुग्णालयांकडून प्रत्येकी ५० ते १०० इंजेक्शनची मागणी केली गेल्याने अपुरा असलेला साठा पाहता रुग्णालयांना दोन ते चार रेमडेसिविर वाटप करण्यात आले. परिणामी, अत्यवस्थ रुग्णांना ते मिळत नसल्याने त्यांची प्रकृती गंभीर होण्याच्या वा दगावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. कंपन्यांकडूनच पुरेसा साठा होत नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याने व त्यातच काळाबाजाराने डोके वर काढल्यामुळे प्रशासनाने स्वतंत्र तहसीलदाराची नेमणूक करून त्यांच्याकडे सारे नियंत्रण सोपविले. मात्र, त्याबाबतच्या तक्रारी कमी झाल्या नाहीत. खुद्द पालकमंत्र्यांकडे तक्रारी गेल्याने तहसीलदाराकडून हे नियंत्रण काढून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे ते सोपविण्यात आले. त्यांनी हा सारा गोंधळ थांबविण्याचा चंग बांधून स्वतंत्र नवीन सॉफ्टवेअर केले व त्याद्वारे मागणी नोंदविण्याच्या सूचना रुग्णालयांना दिल्या. नवीन प्रयोग सुरू झाल्याने रुग्णालयांना चाचपडत त्यावर कार्यवाही सुरू केली. मात्र, नव्याचे नऊ दिवसांप्रमाणे ही प्रणाली औटघटकेची ठरली. ज्या अधिकाऱ्यावर जबाबदारी सोपविली ते कोरोना बाधित झाल्याने ‘पुन्हा येरे माझ्या मागल्या’प्रमाणे प्रशासनाने ‘नाशिक मित्र’ या संकेतस्थळाचा वापर करण्याचे फर्मान काढून त्यावर रुग्णालयांनी मागणी नोंदविण्याच्या सूचना केल्या. परिणामी, पुन्हा नवीन प्रयोग सुरू करण्यात आला. मात्र, रेमडेसिविरची चणचण व त्यातून होणारा काळाबाजार थांबला नाही. उलट, कोरोनाबाधित रुग्णाला रेमडेसिविरच्या सहा मात्रा आवश्यक असताना उपचारार्थ १४ दिवस उलटूनही त्याला पुरेसे डोस उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांची प्रकृती अत्यवस्थ होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
चौकट===
म्हणूनच गुन्हे दाखल
प्रशासनातील व्यवस्थापनातील दोष लक्षात घेऊनच रेमडेसिविरच्या काळाबाजाराला चालना मिळाली. परिणामी, पंचवटीत एका रुग्णालयातील डाॅक्टरलाच काळाबाजार करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले, तर गंगापूर रोड येथील एका रुग्णालयातील वॉर्डबॉयकडून रेमडेसिविरचे इंजेक्शन ताब्यात घेण्यात आले. या दोन्ही प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.