नाशिक - सातपूर येथील एमएचबी कॉलनीतील डॉ. तुषार पाटील यांच्या वाहनामध्ये बेकायदेशिरपणे गर्भजल लिंग चाचणीसाठी लागणारे साहित्य आढळून आल्याने पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने डॉ. पाटील यांचे शाकुंतल डायग्नोस्टीक सेंटरमधील सोनोग्राफी मशीन सील करण्याची कारवाई केली आहे. दरम्यान, महापालिकेने सदर केंद्राची नोंदणीही निलंबित केली असून लवकरच त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी दिली आहे.महापालिकेला ‘आमची मुलगी’ या संकेतस्थळावर सातपूर येथील शाकुंतल डायग्नोस्टीक सेंटरचे डॉ. तुषार पाटील यांचे वाहनाबाबत तक्रर प्राप्त झाली होती. त्यानुसार महापालिकेच्या डॉ.आरती चिरमाडे, डॉ. विजय देवकर आणि डॉ. जितेंद्र धनेश्वर या पथकाने सदर केंद्राची तपासणी केली. पथकाने डॉ. पाटील यांच्या मालकीच्या इनोव्हा वाहनाची (क्रमांक एम.एच. १५ बी डब्ल्यू ५९४९) तपासणी केली असता, गाडीच्या डिक्कीमध्ये रु ग्णांची सोनोग्राफी करण्यासाठी गादी पसरवलेली होती आणि सोनोग्राफी करण्यासाठी लागणारे दोन प्रोब, सोनी व्हीडीओग्राफीक प्रिंटर, लॅपटॉप, गादी, २ उश्या, वेगवेगळे वायर कनेक्टेड, युपीएस, कि बोर्ड, सोनोग्राफी जेल, टीश्यु पेपर आदी साहित्य आढळून आले. सदर साहित्य त्यांनी त्र्यंबक येथील नोंदणीकृत केंद्रावरुन आणल्याचे आढळले. या कृत्यामुळे डॉ. पाटील यांनी पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने डॉ.तुषार पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र त्यांनी नोटीसला सादर केलेला खुलासा व त्यांचे म्हणणे सल्लागार समित्तीवर सादर केले असता त्यांचा खुलासा असमाधानकारक असल्याने त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे येथील अतिरिक्त संचालक तथा राज्य समुचित अधिकारी यांनीही याप्रकरणी कार्यवाही करण्याचे पत्र दिले. त्यानुसार सोमवारी (दि.२०) डॉ.तुषार पाटील यांचे सातपूर येथील एमएचबी कॉलनीतील शांकुतल डायग्नोस्टीक सेंटरमधील सोनोग्राफी मशीन डॉ आरती चिरमाडे, डॉ जितेंद्र धनेश्वर आणि डॉ. सुवर्णा शेफाळ यांनी पंचाच्या समक्ष सील करण्याची कारवाई केली. सदर केंद्राची नोंदणी निलंबीत करण्यात आली असून लवकरच त्यांच्यावर न्यायालयीन कार्यवाहीही केली जाणार असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी म्हटले आहे.केंद्राला महापालिकेचे नोंदणी प्रमाणपत्र नाहीमहापालिकेकडे सदर तक्रार प्राप्त झाल्यानंतर पथक नेमून त्याची तपासणी करण्यात आली. सदर केंद्राला महापालिकेचे नोंदणी प्रमाणपत्र नाही. वाहनातून महापालिका हद्दीबाहेर चाचणी केली जात असल्याचे तपासणीत निदर्शनात आले. त्यामुळे, पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून शहरात कुठे बेकायदेशिरपणे गर्भजललिंग चाचणी होत असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.- डॉ. राजेंद्र भंडारी, वैद्यकीय अधिक्षक, मनपा
नाशिकमध्ये फिरत्या वाहनामध्ये गर्भजल लिंग चाचणीचा उद्योग करण्याचा प्रकार उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 7:17 PM
महापालिकेकडून कारवाई : सातपूरमधील शाकुंतल सोनोग्राफी सेंटर सील
ठळक मुद्दे महापालिकेने सदर केंद्राची नोंदणीही निलंबित केली असून लवकरच न्यायालयीन कार्यवाहीवाहनातून महापालिका हद्दीबाहेर चाचणी केली जात असल्याचे तपासणीत निदर्शनात