येवला : तालुक्याच्या पूर्व भागात तेल कंपनीच्या वतीने जमिनीत बोअरवेल घेऊन त्याठिकाणी स्फोट घडवून आणले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. भूगर्भातील तेल व गॅस साठ्याच्या चाचणीसाठी हे स्फोट केले जात असून, यासाठी २७ गाड्या तालुक्यात आल्या आहेत. परवानगी न घेता नेमके कोणाच्या आशीर्वादाने हे घडत आहे याबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. दरम्यान, याबाबत कौठखेडे येथे शेती असलेले उमेशभाई निशिकांत पटेल यांनी पोलिसांकडे व तहसील कार्यालयाकडे तक्र ार केली आहे. खोदाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी नसल्याने तहसीलदार नरेश बहिरम यांनी गवंडगाव येथील पाच गाड्यांच्या चाव्या काढून घेत ही मोहीम थांबवली. दरम्यान, रविवारी रेंडाळे परिसरात या गाड्यांचा ताफा आला. शेतकऱ्यांनी याबाबत चौकशी केली केली असता परिसरात खनिज तेलाचे साठे कोठे आहेत याबाबत बोअर घेऊन शोधमोहीम चालू आहे. हे काम केंद्र शासनामार्फत चालू असल्याचे आणि जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन चालू असल्याची माहिती संबंधितांनी दिली. कौठखेडा परिसरात शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये या बोअरवेलच्या गाडी घालून शंभर फुटाच्या आसपास बोअर घेतली जात आहे. या बोअरवेलमध्ये मोठ्या क्षमतेच्या डिटोनेटरचे स्फोट घडवले जात आहेत. यामुळे अनेकांच्या बोअरवेलचे पाणी गायब झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. स्फोट करून नेमके काय पाहिले जात आहे हे शेतकऱ्यांना समजत नाही. एका तेल कंपनीकडून गोदावरी नदी ते नर्मदा नदी असा हा सर्व्हे असल्याचे बोलले जात असले, तरी अशी काही बोअरवेल करून स्फोट घडवण्याची परवानगी कोणाला दिल्याची माहिती वा आदेश महसूल प्रशासनाकडेही आलेले नाहीत. त्यात बोअरवेल घेणारे कामगार हे परप्रांतीय असून, त्यांना हिंदी भाषेतूनसुद्धा संवाद साधता येत नसल्याने व त्यांच्याबरोबर कोणीही जबाबदार अधिकारी नसल्याने, त्यात रेल्वे मार्गानजीकच्या परिसरामध्ये हे स्फोट घडवले जात असल्याने संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत उमेशभाई निशिकांत पटेल यांनी पोलिसांकडे व तहसील कार्यालयाकडे तक्र ार केली आहे. भाषेच्या अडचणीमुळे नेमके कोणत्या विभागाकडून हे काम चालू आहे, याची माहिती होत नसून या लोकांना असे काही करण्याचे आदेश नाशिक जिल्ह्यात नाही वा तशी त्यांना परवानगीही मिळालेली नाही. तरीही उमेश पटेल यांच्या शेतात या लोकांनी परवानगी न घेता उभ्या पिकात गाड्या घालून पाच ठिकाणी बोअर घेतले. गाड्या उभ्या केल्यानंतर रेल्वे मार्गानजीक डिटोनेटर फायरिंग करण्याचे चार्जिंग मशीन लावून शेतातील बोअरमध्ये स्फोट करण्याच्या प्रयत्नात हे लोक असल्याने रात्री उशिरा परत उमेश पटेल यांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. (वार्ताहर)येवल्याच्या पूर्व भागात याबाबत काही शेतकरी संभ्रमात असल्याने ते कोणीही पुढे आले नाही. तहसीलदार नरेश बहिरम यांनी याठिकाणी पाहणी केली. परिसरात बोअर घेऊन त्यात स्फोट घडवल्याने आपल्या बोअरवेलचे वा विहिरींचे पाणी गायब होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
येवल्याच्या पूर्व भागात घडविले जाताहेत स्फोट
By admin | Published: January 22, 2017 11:27 PM