नाशिक : द्राक्ष हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा काळ पूर्ण होत असला तरी अद्याप निर्यातीला फारशी चालना मिळालेली दिसत नाही. साडेतीन महिन्यात युरोप आणि इतर देशांमध्ये ४०१०३ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. दरम्यान, अद्याप ग्राहकांच्या पसंतीस उतरतील अशी द्राक्ष तयार होत नसल्याने बागायतदारांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. देशांतर्गत बाजारपेठेत पांढऱ्या द्राक्षांना ३५ ते ५५ रुपये, तर काळ्या द्राक्षांना ५० ते ७५ रुपये प्रति किलो इतका दर मिळत आहे. निर्यातक्षम द्राक्षांना ६५ ते ८० रुपयांचा दर मिळत आहे. या वर्षी थंडीचे प्रमाण अधिक राहिल्याने अद्याप द्राक्षांमध्ये म्हणावा तसा गोडवा उतरलेला नसल्याचे द्राक्ष उत्पादकांकडून सांगितले जात आहे. जिल्ह्यात ऑक्टोंबरपासून अर्ली द्राक्षांचा हंगाम सुरू होतो. त्यानंतर जानेवारीपासून नियमित हंगामास सुरुवात होत असते. नियमित हंगाम सुरू होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी होत आला असला तरी शेतकऱ्यांचा अपेक्षेप्रमाणे अद्याप मालाला उठाव नाही. देशात यावर्षी सर्वत्र थंडीचे प्रमाण अधिक असल्याने अद्याप द्राक्षांना फारशी मागणी नसल्याने अनेक द्राक्षबागांमध्ये अद्याप तोडा सुरू झालेला नाही. थंडी जास्त काळ राहिल्याने अजूनही परिपक्व द्राक्षांना मनाप्रमाणे कलर येत नाही, त्याचप्रमाणे साखर उतरण्याचे प्रमाणही कमी जास्त होत असल्यामुळे फारसा गोडवा जाणवत नाही. यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
चौकट-
हंगाम सुरू झाल्यानंतर १ नोव्हेंबर ते २१ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यातून युरोपमध्ये २४९०० मेट्रिक टन तर नॉन युरोपियन देशांमध्ये १५२०३ मेट्रिक टन इतकीच द्राक्ष निर्यात झाली आहेत. २७८९ कंटेनरमधून हा माल परदेशांमध्ये पाठविण्यात आला आहे. देशांतर्गत बाजारपेठेतही द्राक्षाला अद्याप मागणी वाढलेली नाही. यामुळे पुढील काळात काय स्थिती राहील याचा अंदाज बांधणे कठीण असल्याने बागायतदारांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
चौकट-
द्राक्षांची प्रत, त्यातील साखरेचे प्रमाण यावरून त्याचे दर ठरत असतात. यावर्षी काही बागांमध्ये द्राक्ष परिपक्व झाले. मात्र गोडवा कमी असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम दरांवर होत आहे. गोडवा उतरत नाही असे नाही, पण त्यास थोडा अधिक काळ जाऊ द्यावा लागत आहे. त्याचाही उत्पादकांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.