जिल्ह्यात साधारणत सप्टेंबरपासून अर्ली द्राक्षांचा हंगाम सुरू होत असतो. बहुतेक अर्ली द्राक्षांची परदेशात निर्यात होत असते. मागील वर्षापासून असलेल्या कोरोना संकटामुळे द्राक्ष निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. युरोपातून होणारी मागणी घटल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला निर्यातक्षम माल स्थानिक बाजारात आणला. मात्र, स्थानिक बाजारातही द्राक्षांचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.
जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला निर्यातक्षम माल स्थानिक बाजारपेठेत विकण्याचा निर्णय घेतला. स्थानिक बाजारपेठेतही फारसी मागणी नसल्याने द्राक्षांचे दर घसरले आहेत. यामुळे उत्पादकांची आर्थिक ओढाताण वाढली असून, पुढील हंगामाच्या खर्चाचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. योग्य दर न मिळाल्याने अनेकांना खत-औषधांची उधारी भागविणेही कठीण झाले आहे. शासनाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
इन्फो
युरोप, आखाती देशातून मागणी कमी
यावर्षी नोव्हेंबर २०२० ते ५ एप्रिलपर्यंत केवळ एक लाख १७ हजार ८९१ मेट्रिक टन इतकीच द्राक्ष निर्यात झाली आहे. युरोपियन देशांमध्ये ९०,३११, तर नॉनयुरोपीयन देशांमध्ये २७,५८० मेट्रिक टन इतकी द्राक्ष निर्यात झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे अनेक युरोपीयन देशांमधील काही प्रांतांमध्ये अद्याप लॉकडाऊन सुरू आहे. आखाती देशांमध्येही कोरोनामुळे द्राक्षांना मागणी नाही.