नाशिक : जिल्ह्यात दर महिन्याला सहा या प्रमाणात गेल्या सात महिन्यांत स्वाइन फ्लूमुळे ४२ बळी गेल्याच्या घटनेबद्दल पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या जिल्हा आरोग्य समन्वय समितीच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. स्वाइन फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याबरोबरच रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात टॅमी फ्लूचा साठा ठेवण्याच्या सूचना महाजन यांनी यावेळी दिल्या.विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीत साथजन्य रोगप्रतिबंधासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात येणाºया उपाययोजनांची माहिती देण्यात आली. जिल्ह्यात स्वाइन फ्लू व डेंग्यू या दोन रोगांबाबत विशेष दक्षता घेण्याची गरज यावेळी बोलून दाखविण्यात आली तसेच दोन्ही रोगांच्या प्रतिबंधाबाबत आरोग्य यंत्रणेची स्वतंत्र बैठक घेण्यात यावी, अशी सूचना गिरीश महाजन यांनी यावेळी केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जगदाळे यांनी स्वाइन फ्लूबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनेची माहिती दिली तर जिल्हा आरोग्य अधिकारी सुशील वाकचौरे यांनी साथजन्य रोगाबाबत माहिती दिली. बैठकीस खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन्, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, डॉ. सुशील वाकचौरे आदी उपस्थित होते.
स्वाइन फ्लूच्या वाढत्या प्रसारामुळे चिंता व्यक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:45 AM