नाशिक : तंत्र व व्यावसायिक शिक्षण प्रवेशासाठी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. मात्र, जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत संपुष्टात आली असतानाही जातपडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने प्रवेशाची मुदत वाढवून देण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
समाजकल्याण विभागाकडून जातप्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याने जिल्हयातील अनेक विद्यार्थी तंत्रशिक्षण व व्यावसायिक प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेताना जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेशानंतर तीन महिन्यांची मुदत देण्यात येत होती. मात्र, यावर्षी प्रवेश घेतेवेळीच जातपडताळणी प्रमाणपत्र जोडणे शासनाने बंधनकारक केले आहे. ही मुदत संपुष्टात आली असून अनेक विद्यार्थ्यांना शुक्रवारी (दि.१५) सायंकाळपर्यंत जात प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांचा विचार करून प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्याची हेमंत गोडसे यांनी केली आहे.