नाशिक : आरटीई प्रवेशासाठी पहिल्या सोडतीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी १० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेशप्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत १ हजार ९६४ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. त्यामुळे पहिल्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या पालकांना १० एप्रिलपर्यंत सोडतीद्वारे संधी मिळालेल्या शाळेत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशप्रक्रियेस मुदतवाढ दिल्यामुळे आता संबंधित शाळांनाही १० एप्रिलपर्यंत प्रवेशाची सर्व प्रक्रि या पूर्ण करावी लागणार असून, त्यानंतर पहिल्या फेरीचा अहवाल शिक्षण विभागाकडे सादर करावा लागणार आहे. पहिल्या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करून विविध अडचणींविषयी प्राप्त तक्रारींचे निराकरण केल्यानंतर दुसरी सोडत जाहीर केली जाणार आहे. आरटीई प्रवेशासाठी यावर्षी सर्वाधिक १० हजार ४१६ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दाखल झाले असून, एका विद्यार्थ्याची केवळ एकाच शाळेत लॉटरी जाहीर झाली आहे. पहिल्या सोडतीत आतापर्यंत १ हजार ९६४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून, १० एप्रिलपर्यंत प्रवेश घेता येईल. शिक्षण विभागाने दिलेल्या मुदतवाढीची माहिती एसएमएसद्वारे कळविण्यात आली असून, आरटीईच्या संकेतस्थळावर प्रवेशासाठीची सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.सोडतीत प्राप्तजागेवर प्रवेश अनिवार्यशिक्षण विभागाने दिलेल्या मुदतीत लॉटरी लागलेल्या शाळेत संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेश घेतला नाही त्या पाल्यांचे प्रवेश पुढील सर्व फेऱ्यांसाठी अपात्र ठरणार आहेत. शिक्षणहक्क कायद्याअंतर्गत राखीव असलेल्या २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी जिल्ह्यातील ६ हजार ५८९ जागांसाठी पहिल्या फेरीनंतर अजून दुसरी व तिसरी सोडत जाहीर केली जाणार आहे.
शिक्षणहक्क प्रवेशासाठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 1:02 AM