नाशिक : गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या मैत्रेय कंपनीच्या संचालक वर्षा सत्पाळकर व जनार्दन परुळेकर यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आणखी ३ कोटी रुपये इस्क्रो खात्यात जमा केले असून, न्यायाधीश एम़ एच़ मोरे यांनी या दोघांच्याही जामिनास २ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे़दरम्यान, पोलिसांत तक्रार दाखल न केलेले एजंट व महिला गुंतवणूकदारांनी न्यायालयात गर्दी करून सत्पाळकरांशी बोलण्याचा प्रयत्न केला़ मात्र, महिलांचा रोष पाहता पोलिसांनी सत्पाळकरांना दुसऱ्या दरवाज्याने न्यायालयाबाहेर काढले़ गुंतवणुकीची मुदत पूर्ण होऊनही आर्थिक परतावा न दिल्याने मैत्रेय कंपनीचे संचालक सत्पाळकर व परुळेकर या दोघांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एपीआयडी) कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे़ न्यायालयाने या दोघांनाही सशर्त जामीन मंजूर करून बँकेत संयुक्त खाते इस्क्रोमध्ये पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यानुसार मागील सुनावणीच्या वेळी कंपनीने या खात्यात अडीच कोटी रुपये जमा केले होते़ दरम्यान, पोलिसांकडील तक्रारदारांमध्ये वाढ होऊन फसवणुकीची रक्कम सहा कोटींपर्यंत पोहोचली आहे़ मैत्रेयने तक्रारदारांच्या परताव्याच्या रकमेनुसार इस्क्रो खात्यात पैसे जमा करावे यासाठी पोलिसांनी प्रयत्नशील होते़ त्यानुसार न्यायालयाच्या आदेशानुसार १९ जूनपर्यंत अधिकाधिक रक्कम पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते़ यानुसार कंपनीने सोमवारी (दि़२०) ३ कोटी रुपयांचा भरणा केल्याने या खात्यात आतापर्यंत ५ कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे़ मैत्रेयने ही रक्कम इस्क्रो खात्यात जमा केली नसती तर न्यायालयाने या दोघांचेही जामीन रद्द केले असते़ (प्रतिनिधी)मैत्रेयवर अजूनही विश्वास़़़मैत्रेयकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रारी करण्याचे आवाहन सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ़सीताराम कोल्हे यांनी केले होते़ मात्र तरीही सत्पाळकरांवर विश्वास असलेल्या बहुतांशी एजंटांनी आपल्या गुंतवणूकदारांना तक्रार करण्यापासून रोखले होते़ त्यातच संचालकांनी केवळ तक्रारदारांचेच पैसे परत करण्याबाबत बांधील असल्याचे न्यायालयात सांगितल्याने तक्रार न केलेल्या गुंतवणूकदारांनी न्यायालयात गर्दी केली होती़ तसेच केवळ एक मिनिट बोलू द्या, अशी विनंती पोलिसांकडे केली. मात्र ती फेटाळण्यात आली़
‘मैत्रेय’ संचालकांच्या जामिनास मुदतवाढ
By admin | Published: June 20, 2016 11:05 PM