नाशिक : राज्य निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरमधील तांत्रिक दोषामुळे ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या अडचणींबाबत अनेक जिल्ह्यांमधून तक्रारी वाढल्यामुळे शुक्रवारी निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यास तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. संगणकीय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या अडचणींचा विचार करता निवडणूक अधिकाºयांनी हस्तलिखित याद्या तयार करून त्या जाहीर करण्यासही आयोगाने मुभा दिली आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान मुदत संपणाºया ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्या जाहीर करण्याचे आदेश दिले होते. आयोगाच्या पहिल्या आदेशानुसार १८ एप्रिल रोजी याद्या जाहीर होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात राज्य निवडणूक आयोगाच्या मतदार याद्या निश्चित करण्यासाठी वापरल्या जाणाºया संगणकीय सॉफ्टवेअरमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे प्रारूप यादी जाहीर करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. ज्या ग्रामपंचायतीच्या याद्या जाहीर करण्यात येणार आहेत, त्या ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी मतदारांच्या नावाव्यतिरिक्त प्रत्येक जिल्ह्यातील मतदारांची नावे त्यात समाविष्ट होण्याचे प्रकार राज्य आयोगाच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून होत असल्याने याबाबत आयोगाकडे तक्रार केली असता आयोगानेही दोष मान्य करून २० एप्रिल रोजी प्रारूप मतदारयाद्या जाहीर करण्याची मुदत वाढवून दिली. तथापि, सॉफ्टवेअरमधील तांत्रिक दोष दूर होऊच शकला नाही. त्यामुळे गुरुवारी दिवसभर निवडणूक अधिकाºयांनी हरतºहेचे प्रयत्न केले. परंतु त्यातील दोष दूर झाले नाहीत. शनिवारी जाहीर होणाºया मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी दि. २५ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली असून, दि. २७ एप्रिल रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.हस्तलिखित याद्या जाहीर करण्याची मुभाआयोगाकडून संगणकीय प्रणालीच्या माध्यमातूनच मतदार याद्या प्रसिद्ध करण्याच्या सक्तीच्या सूचना असल्यामुळे निवडणूक अधिकारीही पेचात सापडले होते. शुक्रवारी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यासाठी अधिकाºयांचा खटाटोप सुरू असताना आयोगाने तिसºयांदा मतदार यादीचा फेर कार्यक्रम जाहीर केला. त्यात ज्या ग्रामपंचायतींच्या संगणकीय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात तांत्रिक अडचणी येत असतील त्या ग्रामपंचायतीच्या हस्तलिखित मतदार याद्या जाहीर करण्याची मुभा दिली असून, अशा याद्या आता शनिवारी (दि. २१) प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अंतिम मतदार यादी जाहीर करण्यास पुन्हा मुदतवाढ मिळाली आहे.
ग्रामपंचायतीच्या मतदार यादीला मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 1:28 AM