अशोेक बिदरीमनमाड (जि. नाशिक) : मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसच्या वेळेत सुटणाऱ्या मनमाड-मुंबई-मनमाड या पर्यायी स्पेशल एक्स्प्रेसला १ एप्रिल ते ३० जून २०२३ पर्यंत अप व डाऊनच्या ७८ फेऱ्या चालविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या स्पेशल गाडीची सध्याची मुदत ३१ मार्चला संपत होती. परंतु प्रवाशांच्या मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामुळे या गाडीस पुढील तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे.
मात्र याबरोबरच याआधीची उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांची जीवनवाहिनी असलेली मनमाड- लोकमान्य टिळक टर्मिनस गोदावरी एक्स्प्रेस ही मूळ गाडी कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आलेली आहे. ती पूर्ववत सुरू करावी ही प्रवाशांची मागणी आहे. त्याचा अद्यापही रेल्वे प्रशासन विचार करीत नाही याबद्दल प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.